नाशिक : शहरातील चुंचाळे चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यासह इतर मागण्यांसाठी अंबड गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरूवारी चुंचाळे चौकीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येत नसल्याने ३० जुलैपासून नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत चुंचाळे चौकीला पोलीस ठाण्याच्या दर्जा देण्यात आलेला नाही. अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक भूखंड घोटाळे झाले आहेत. त्यासंदर्भात विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत ही समिती स्थापन न होता अवैधपणे भूखंड विकणाऱ्या भूमाफियांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अंबड गावाची १६ हेक्टर गायरान जमीन पुन्हा अंबड औद्योगिक वसाहतीला मोफत देण्यात आली आहे. याबाबत लवकरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात दाद मागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा…नाशिक : निवृत्त महिला ब्रिगेडिअरला सव्वा कोटींना गंडा, शेजाऱ्यांकडूनच धोका

दत्तनगर, कारगिल चौक परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या रासायनिक सांडपाण्यामुळे नापीक झाल्या आहेत. ४० वर्षापासून प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया केंद्र अजूनही होत नाही. प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देण्यात आले. अद्याप पर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येत नसल्याने ३० जुलैपासून नाशिक-मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…पावसाळ्यातही मालेगावात पाणी कपातीचे संकट, आता तीन दिवसाआड पुरवठा

यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर, चंद्रकांत दातीर, विलास दातीर, मनोज दातीर यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते,