नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीत खड्डेमय रस्ते, कमी दाबाने पाणीपुरवठा, बंद पथदीप, वाढती अतिक्रमणे, गॅस वाहिनीच्या खोदकामात झालेले नुकसान आदी मुद्यांवरून संतप्त झालेल्या उद्योजकांनी शासकीय अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. सर्व कर वेळेवर भरूनही मूलभूत प्रश्नांसाठी त्रास सहन करण्याची वेळ का येते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

​औद्योगिक मूलभूत सुविधांबाबत एमआयडीसी, एमएनजीएल, महापालिका, महावितरण, वाहतूक आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, उपाध्यक्ष जितेंद्र आहेर, सरचिटणीस संजय महाजन, दिलीप वाघ, अविनाश बोडके आणि सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध प्रश्नांवरून पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर, अधिकाऱ्यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजण्याचे आश्वासन दिले. मुदतीत कामे न करणाऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पानसरे आणि महाजन यांनी दिला.

एमआयडीसी ‘एच’ सेक्टरमध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा, व्हॉल्व्ह, डायमीटर दुरुस्ती, मान्सूनपूर्व नालेसफाई, गंगामाई परिसरात साचणारे पाणी यावर चर्चा झाली. बैठकीत फायर सेसचा मुद्दा चर्चेला आला. मार्च २०२३ पर्यंतच हा सेस लागू होता. त्या कालावधीपर्यंत ज्यांचा सेस भरावयाचा बाकी आहे, त्यांनाच फक्त दंड आकारला जात असल्याचे एमआयडीसी अधिकारी चंद्रकांत सूरकर यांनी सांगितले. एमएनजीएल गॅस वाहिनीच्या खोदकामात जलवाहिनी फुटणे, बीएसएनएल वायर तुटणे, वीजप्रवाह खंडित होणे, इतर केबल तुटणे आदी तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे निरसन करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित ठेकेदाराने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा
nashik-ambad-midc-industrial-issues-meeting rnb-99

​रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे व डांबरीकरणासाठी निधी मंजूर असून ही कामे तातडीने हाती घेतली जातील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक पथदीप बंद आहेत; त्यांची दुरुस्ती, नवीन खांब टाकणे, प्रत्येक चौकात प्रखर प्रकाशझोताचे दिवे लावण्याची मागणी करण्यात आली. सेक्टरनिहाय साफसफाई करण्याचा संकल्प करण्यात आला. पावसाळ्यात कचरा रस्त्यावर येऊ नये, यासाठी कचऱ्याचे ढीग उचलण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

संरक्षक भिंतीबाहेरील अतिक्रमणे, भंगार व मांस विक्री दुकाने आदींबाबत एमआयडीसी, महापालिका व वाहतूक विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे ‘आयमा’चे माजी अध्यक्ष जे. आर. वाघ यांनी निदर्शनास आणले. चर्चेत एमआयडीसीचे चंद्रकांत सूरकर, राजेंद्र देवरे, संदीप काटकर, महापालिकेचे नानासाहेब साळवे, हेमंत पठे; महावितरणचे आर. बी. भांबर, गणेश कुशारे, एच. एच. चौरे, ए. ए. लंके, एमएनजीएलचे राकेश लउर, ऋषिकेश आहेर, एमआयडीसी पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे तसेच महेश सावंत आदी सहभागी झाले होते.