नाशिक – अंबड पोलीस ठाण्यातील निरीक्षकांनी सहज म्हणून केलेल्या गोळीबाराच्या घटनेला महिना उलटला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न आ. सीमा हिरे यांनी विधीमंडळात उपस्थित केला. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसतांना पोलीस ठाण्यातच गोळीबार होणे, ही घटना गंभीर असल्याने शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी आमदार हिरे यांनी केली. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात अशी काही घटना घडली होती की नाही, याबाबत पोलीस यंत्रणाही फारसे काही बोलण्यास तयार नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला.
सिडको परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. मारामाऱ्या, तोडफोड, सोनसाखळी चोरी यासह गंभीर गुन्हे रोजच घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींशी पोलीस निरीक्षक राजपूत हे कायमच उर्मट भाषेचा वापर करतात, असा आरोपही आमदार हिरे यांनी केला आहे. राजपूत यांच्या मनमानी कार्यपध्दतीच्या विरोधात सिडकोवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कथित गोळीबाराची घटना महिनाभरापूर्वीची असल्याकडे आ. सीमा हिरे यांनी लक्ष वेधले.
दोघे जखमी ?
महिनाभरापूर्वी रात्री राजपूत हे काही मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या आवारात उभे होते. सहज म्हणून राजपूत यांनी गोळीबार केला. त्यावेळी गोळी लागून उपनिरीक्षक आणि हवालदार जखमी झाले. या घटनेला महिना उलटला तरी संबंधितावर कोणतीही कारवाई न झाल्याने आमदार हिरे यांनी विधीमंडळात याविषयी प्रश्न उपस्थित केला.
सीसी टीव्ही चित्रणही गायब ?
राजपूत यांना कोण आणि का पाठीशी घालत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. सदरची घटना लपविण्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसी टीव्ही चित्रणही गायब झाले असण्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार हिरे यांनी केली. पोलीस निरीक्षक राजपूत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या आवारातच गोळीबाराची घटना घडल्याचा आरोप करीत त्यात उपनिरीक्षक व कर्मचारी जखमी झाल्याची बाब स्थानिक आमदार हिरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात मांडली. या संदर्भात नाशिक शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.
