नाशिक – सिमेंट बंधारा दुरुस्ती कामाचे देयक मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेत लघू पाटबंधारे विभागाच्या महिला कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आल्याच्या घटनेला फारसा कालावधी झाला नसताना आता वडिलोपार्जित जमिनीचे रेकॉर्ड व कब्जाबाबत कार्यवाही करण्यासाठी वडाळी भोई येथील महिला मंडळ अधिकारीला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

योगिता आनंद भोये (३८) असे या चांदवड तालुक्यातील महिला मंडळ अधिकारीचे नाव आहे. त्या नाशिक शहरातील बोरगड येथील प्रगतीनगरमधील रो हाऊसमध्ये वास्तव्यास आहे. तक्रारदाराची खडक ओझर शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या शेत जमिनीच्या कब्जाबाबत वाद निर्माण झाल्याने या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने तक्रारदाराला कब्जा देण्याबाबत महसूल विभागाला आदेश दिले होते. या आदेशान्वये चांदवड तहसीलदारांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करून तक्रारदाराला न्यायालयाच्या निर्णयान्वये मूळ रेकॉर्ड व कब्जा देण्याबाबत वडाळी भोईच्या मंडळ अधिकारी योगिता भोई यांना आदेशित केले होते. या आदेशान्वये कारवाई करून तक्रारदाराला रेकॉर्ड व कब्जाबाबत कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात भोई यांनी स्वतासाठी तसेच सजा खडक ओझर येथील तलाठी यांच्या नावाने ६० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये निश्चित झाले. लाचेची ही रक्कम स्वीकरताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोये यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक भारत तांगडे, अपर अधिक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी, कॉन्टेबल अनिल गांगोडे व हवालदार प्रमोद चव्हाणके यांचा समावेश होता. दरम्यान, शासकीय कार्यालयात कुठल्याही कामासाठी अधिकारी वा कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कुणी लाच मागत असल्यास तसेच भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास लाचलुचपरत प्रतिबंधक विभागाशी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२५३-२५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या दीड महिन्यात लाचखोरीच्या जाळ्यात अडकलेली ही दुसरी महिला आहे. सिमेंट बंधारा दुरुस्ती कामांचे देयक मंजूर करण्यासाठी ७२ हजार रुपयांची मागणी करीत तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषदेतील लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता (वर्ग एक) वैशाली तुळशीराम ठाकरे (४२) यांच्यासह तिघांना पकडण्यात आले होते.