नाशिक – चित्रकलेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या स्पेनमधील अल्मेरिया शहरात “अल्मा इंटरनॅशनल मेडिटेरियन आर्ट एक्झिबिशन फेस्टिवल” २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रतिष्ठित फेस्टिवलसाठी जगभरातून केवळ १४ देशांतील प्रख्यात कलाकारांची निवड करण्यात आली आहे. त्यात अमेरिकेचे अँडी इव्हन्सन, झेक रिपब्लिकचे थॉमस फिसेरा, रशियाची जुलिया बर्मिनोव्हा, स्पेनचे जुआन सुतारियो यांसारख्या नामांकित कलाकारांचा समावेश असून भारतामधून केवळ एकाच चित्रकाराला निमंत्रित करण्यात आले आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान नाशिकच्या चित्रकाराला मिळाला आहे.

स्पेन सरकारच्या अल्मेरिया सिटी कौन्सिल, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड टुरिझम आणि पॅरेस कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत फेस्टिवल काबो दे गाटा काँग्रेस ॲण्ड एक्झिबिशन सेेंटर या भव्य वास्तूमध्ये आयोजित करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबरला संध्याकाळी या फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे. या फेस्टिवलसाठी भारतातून एकमेव आमंत्रित करण्यात आलेले नाशिकचे आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांची विशेष निमंत्रित पाहुणे चित्रकार म्हणून उदघाटन सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. या फेस्टिवलमध्ये जगभरातील निवडक चित्रकारांची चित्रे व शिल्पांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच जलरंग माध्यमातील एक प्रतिष्ठित लाईव्ह पेंटिंग स्पर्धा देखील होणार असून त्याचे सन्माननीय परीक्षक म्हणूनही प्रफुल्ल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्पॅनिश कलाकारांसमोर प्रफुल्ल सावंत हे जलरंगातील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. नाशिकच्या जलरंग परंपरेचा जागतिक पातळीवर गौरव होण्यास ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. यापूर्वीही प्रफुल्ल सावंत याना अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, मेक्सिको, स्वित्झर्लंड, ग्रीस, चीन, तुर्की, थायलंड आदी ३५ हून अधिक देशांमध्ये प्रात्यक्षिके व प्रदर्शने करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरवर्षी १२–१५ देशांमधून नियमित निमंत्रण येणारे ते एकमेव भारतीय जलरंगचित्रकार आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी ३५ हून अधिक देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पेनमधील या प्रदर्शनात प्रफुल्ल सावंत यांची २ x २.५ फूट आकारातील आठ विविध जलरंगातील चित्रे प्रदर्शित होणार आहेत. त्यामधील “वे टू गोदाघाट” हे नाशिकच्या तिवंधा येथे घाटाकडे जाणाऱ्या अरुंद गल्लीचे चित्र विशेष लक्षवेधक ठरणार आहे. स्पॅनिश कलाकारांना प्रफुल्ल सावंत यांच्या जलरंग शैली आणि तंत्राचा प्रत्यक्ष अभ्यास करता यावा म्हणून २९ नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून ती आधीच हाऊसफुल्ल झाली आहे .,त्यात प्रफुल्ल सावंत स्पॅनिश चित्रकाराना जलरंगाचे धडे देणार आहेत. आजवर प्रफुल्ल सावंत यांच्या कलाकृतींना विविध देशांतील ५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून यावर्षी जून मधे जर्मनीतील नामांकित दा विन्सी आर्टिस्ट ब्रुशेस कंपनीने “प्रफुल्ल सावंत सिग्नेचर सीरिज” ब्रशेस जगभरात प्रदर्शित करून त्यांचा यथोचित सन्मान केला.