नाशिक – महिला लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित अशोक खरात प्रकरणात आता शहरातील बहुचर्चित हॉटेल आणि पाथर्डी-गौळाणे परिसरात अलिशान क्लब असणाऱ्या मालकाची विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे.

संबंधिताच्या हॉटेलमध्ये अशोक खरात पीडित महिलांना घेऊन जात असे, अशा तक्रारींचा एसआयटीकडून तपास केला जात आहे. खरात आणि बहुचर्चित हॉटेलमालक यांच्यात संपर्क होता, या संदर्भातील माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली असून पुढील काळात या अनुषंगाने संबंधित हॉटेल मालकाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

ज्या हॉटेल मालकाची एसआयटीने चौकशी केली, ते हॉटेल मागील वर्षी हनी ट्रॅप प्रकरणात चांगलेच गाजले होते. राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाल्यानंतर समाजमाध्यमांत यावर बरीच चर्चा झाली होती. अधिकृतपणे तक्रार नसल्याने हनीट्रॅपच्या जाळ्यात कोण अडकले, ते समोर आले नाही.

खंडणीच्या मागणीत परस्परविरोधी तक्रारी झाल्या, परंतु, नंतर त्या मागे घेतल्या गेल्याची चर्चा होती. हनी ट्रॅप प्रकरणाचा राज्यात बोभाटा झाल्यामुळे शहरातील ते बहुचर्चित हॉटेल आणि त्या हॉटेल मालकाशी संबंधित गौळाणे-पाथर्डी भागातील क्लब येथून बडी मंडळी अंतर्धान पावली होती. याच हॉटेल, क्लब मालकाचे नाव आता खरात प्रकरणात समोर आले आहे.

महिला लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे संबंधित हॉटेल मालकाबाबत लेखी तक्रार आली. त्यात खरात पीडितांना संबंधिताच्या हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार एसआयटीने चौकशी सुरू केल्याचे एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने सांगितले.

संशयित खरात आणि संबंधित हॉटेल मालक एकमेकांच्या संपर्कात होते. या संदर्भातील काही माहिती (डेटा) यंत्रणेला मिळाली आहे. खरातने अटक होऊ शकते, हे लक्षात आल्यावर भ्रमणध्वनीतील बरीचशी संशयास्पद माहिती नष्ट केली होती. यातील काही माहिती पुन्हा मिळविण्यात (रिकव्हर) आल्याचे सांगितले जाते.

संबंधित हॉटेल मालक आणि खरात यांच्यातील संबंधांबाबत चौकशी करण्यात आली. या अनुषंगाने पुन्हा त्या हॉटेल, क्लब मालकाला चौकशीसाठी बोलावले जाईल. संबंधिताचा भ्रमणध्वनी अद्याप तपास यंत्रणेने तपासासाठी घेतलेला नसल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.