नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच, त्याआधीचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार देखील प्रसन्न होते. मार्च २०१८ मध्ये आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या अखेरच्या दिवशी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत खरातच्या श्री ईशानेश्वर देवस्थानच्या एक कोटी पाच लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला भोंदूबाबा खरातच्या श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी देण्याचा निर्णय महायुती सरकारने नुकताच रद्द केला. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने ३१ मार्च २०१८ मध्ये घेतलेला निर्णय समोर आला आहे. आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या अखेरच्या दिवशी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कामांना प्रशासकीय मान्यता देत निधी वितरण्यास मान्यता दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील ५८ देवस्थान, मंदिर परिसर, पर्यटन निवासच्या विकासासाठी सुमारे ११२ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २०१७-१८ वर्षात सुमारे १७ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम, महापालिका व जिल्हा परिषद अशा संबंधित विभागाकडे वितरणास मान्यता देण्यात आली होती. हा निर्णय घेतला गेला तेव्हा पर्यटन खात्याची जबाबदारी भाजपचे जयकुमार रावल यांच्याकडे तर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मिरगाव येथे भोंदूबाबा खरातचे श्री सिद्धक्षेत्र ईशानेश्वर देवस्थान आहे. या ठिकाणी एक कोटी पाच लाख ८३ हजार रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली. यामध्ये देवस्थान परिसरात सभामंडप, मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, महिला व पुरूषांसाठी प्रसाधनगृह, वस्त्रांतर खोली, वाहनतळ, भक्त निवास बांधकाम, बगीचा, विद्युतीकरण या कामांचा समावेश आहे. मंजूर निधीपैकी २५ लाख रुपये २०१७-१८ या वर्षात वितरित करण्यात आल्याचे शासन निर्णयावरून अधोरेखीत झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या कामांचा या योजनेत समावेश झाला होता. त्यामध्ये सर्वाधिक निधी मिळविण्यात भोंदूबाबा खरातचे देवस्थान अग्रस्थानी होते.
महाविकास आघाडी सरकारने भोंदू बाबाच्या देवस्थानला ३९ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्याचा निर्णय घेतला होता, त्या देवस्थानवर आधीच्या युती सरकारची कृपा राहिली. ज्या खात्यांची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यांकडे होती, त्यांनी श्री सिद्धक्षेत्र ईशानेश्वर देवस्थानला झुकते माप देत सढळहस्ते विविध कामांसाठी निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
