नाशिक : कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील अत्याचाराचा आरोपी हा पीडितेचाच अल्पवयीन नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आदिवासी विकास विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह अन्य संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कळवण तालुक्यातील या आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे तिच्याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलासोबत संबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली. उन्हाळी सुट्टीत ती घरी गेली होती. तीन दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली आणि हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणातील संशयित अल्पवयीन मुलाला बाल न्याय कायद्यानुसार बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मासिक पाळीची दर महिन्याला नोंद ठेवली जाते. संबंधित विद्यार्थिनीची पाळी चुकल्याचे निदर्शनास आले होते. आरोग्य पथकाने याबाबत मुख्याध्यापक व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देत विद्यार्थिनीची स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र मुख्याध्यापक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. विद्यार्थिनीनेही ही बाब जाणीवपूर्वक लपविल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे, असे पावरा यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पावरा यांनी स्पष्ट केले.

शिक्षण, आरोग्य, सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे वेळेत संबंधितांच्या लक्षात कसे आले नाही, नियमित आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात येत होती आणि या गंभीर दुर्लक्षाला जबाबदार कोण, याचा खुलासा होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी आणि जबाबदार यंत्रणा उभारण्याची गरजही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.