नाशिक – नाशिक शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच महिन्यात पाच नागरिकांचा मृत्यू, दुचाकी घसरणे, कित्येक वाहनचालकांचे जखमी होणे, अशा सततच्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला असताना महापालिका प्रशासन, महापौर आणि नाशिकचे अघोषित पालकमंत्री म्हणून मिरवणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच सत्ताधारी नगरसेवकांना टिकेचे धनी व्हावे लागत आहे. रस्त्यांच्या अवस्थेविषयी फोटोसंशनच अधिक होत असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
नाशिकमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन भाजपच्या नगरसेवकांना कसे लक्ष्य केले जात आहे. आणि ठेकेदार नगरसेवकांचे काहीही ऐकत नाहीत. उलट, त्यांच्याकडे विचारणा केल्यास ते नगरसेवकांनाच कशी धमकी देतात, हे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केंदार यांनीच उघड केले असताना आता प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविरोधात काँग्रेस मैदानात उतरली आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते सुफी जीन यांनी नाशिकमधील खड्डेमय रस्ते आणि सतत होणारे अपघात याविषयी महापौर हिमगौरी आडके आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. “रील्स, फोटोशूट आणि प्रसिद्धी पुरे झाली, आता नाशिककरांचे जीव वाचवा”, असा टोला त्यांनी हाणला आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, सुरु असलेला प्रशासकीय कारभार सातत्याने वादग्रस्त ठरला आहे. विशेष म्हणजे, सत्ताधाऱ्यांकडूनही त्याविषयी नापसंती व्यक्त करण्यात आली असताना काँग्रेस गटनेते सुफी जीन यांनी आपल्या पत्रात ) प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले आहेत. “नाशिकमध्ये सर्वत्र सुरू असलेले खोदकाम, पावसामुळे साचलेल्या पाण्यात न दिसणारे धोकादायक खड्डे आणि रोजची वाहतूक कोंडी यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांची विकासकामे कागदावर दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नाही “, असा आरोप त्यांनी केला.
ठेकेदारांवर याआधी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केंदार यांनीही ठेकेदार कशी दादागिरी करतात, हे मांडले आहे. सुफी जीन यांच्या पत्रामुळेही ठेकेदारांची मनमानी आणि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचा मुद्दा मांडला आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. वाहनचालकांनासह पादचाऱ्यांना अनेक आजार लागले आहेत. मणक्याच्या दुखापती, कंबरदुखी, दुचाकी घसरुन हातपाय मोडणे, असा त्रास सहन करावा लागत आहे. काही अपघातांमध्ये नागरिकांचा जीवही गेला आहे. कुटुंबांवर उपचारांचा मोठा आर्थिक बोजा पडू लागला आहे. त्यामुळे “नाशिककरांना आता केवळ घोषणा, रील्स आणि सोशल मीडियावरील फोटोशूट नको आहेत. त्यांना सुरक्षित रस्ते, दर्जेदार कामे आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व हवे आहे. रस्त्यावर पडणारा प्रत्येक नागरिक हा अपघाताचा नव्हे, तर या निष्काळजी व्यवस्थेचा बळी आहे”,, असे सुफी जीन यांनी खुल्या पत्रात नमूद केले आहे.
जीन यांनी पत्रात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, धोकादायक खड्डे आणि रस्ते तातडीने बुजवावेत, कोणतेही खोदकाम सुरू करण्यापूर्वी नागरिकांसाठी योग्य पर्यायी रस्त्यांची सोय उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.
