Nashik Bhavali Dam Attack Case Details: नाशिकमधील इगतपुरी जवळील भावली धरणाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबाला अत्यंत धक्कादायक आणि थरारक अनुभवाला सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्यामुळे, संतप्त झालेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने या पीडित कुटुंबाचा तब्बल २५ ते ३० किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. इतकेच नव्हे, तर चालत्या गाडीवर रॉड आणि बेसबॉल बॅटने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी नाशिकमधील एक कुटुंब (एकूण ८ सदस्य) इगतपुरी जवळील प्रसिद्ध भावली धरणावर पर्यटनासाठी गेले होते. तिथे एका निर्जन ठिकाणी फिरत असताना हा संपूर्ण प्रकार घडला.

छेडछाडीला विरोध केला अन् वाद पेटला

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही सगळे भावली धरणावर गेलो होतो. तिथे २० ते २५ वयोगटातील दोन तरुणांनी माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पण्या करत छेडछाड केली. मी तात्काळ त्यांना हटकले आणि कडक शब्दांत सुनावले. त्यामुळे आमच्यात वाद सुरू झाला. तितक्यात माझे पती आणि दीर तिथे आले आणि त्यांनी त्या तरुणांना जाब विचारला. त्यानंतर ते दोघे तरुण तिथून निघून गेले.”

मात्र, हा वाद तिथेच संपला नाही. थोड्याच वेळात ते दोन तरुण त्यांच्या गावातील ८ ते १० जणांच्या टोळक्याला घेऊन परतले. त्यांनी पीडित कुटुंबाशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिथल्या काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पीडित कुटुंब तिथून आपल्या गाडीने नाशिकच्या दिशेने निघून गेले.

हायवेवर १५ ते ३० किलोमीटर थरारक पाठलाग

अंगावर काटा आणणारा खरा थरार यानंतर सुरू झाला. पीडित कुटुंबाने सांगितले की, “आम्ही नाशिक हायवेच्या दिशेने गाडी काढली, तेव्हापासून त्या गुंडांनी कारमधून आमचा पाठलाग सुरू केला. आमच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न ते करत होते. आम्ही नाशिक हायवेवर पोहोचताच, मागून बाईकवरून आलेल्या दोघांनी आमच्या चालत्या गाडीवर पाठीमागून बेसबॉल बॅटने सपासप वार करण्यास सुरुवात केली.”

“जीव वाचवण्यासाठी आम्ही अत्यंत वेगाने नाशिकच्या दिशेने गाडी पळवत होतो. पण हायवेवर ट्रॅफिक (वाहतूक कोंडी) असल्याने आमची गाडी अडकली. याचा फायदा घेत ते गुंड तिथेही पोहोचले. त्यांनी ट्रॅफिकमध्ये विरुद्ध दिशेने गाडी आणून थेट आमच्या समोर आडवी लावली आणि पुन्हा गाडीच्या काचा फोडल्या. आम्ही कसेबसे तिथून गाडी वळवली आणि पुन्हा इगतपुरीच्या दिशेने पळू लागलो. त्याच वेळी एका गुंडाने आमच्या चालत्या गाडीवर उडी मारली आणि तो गाडीला लटकला. त्यामुळे आम्हाला वेग वाढवणे कठीण जात होते, पण आम्ही कशीबशी गाडी वळवून त्याला खाली पाडले.”

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नऊ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून नऊ संशयित ताब्यात

या जीवघेण्या थरारानंतर पीडित कुटुंबाने थेट नाशिक गाठले आणि पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला असून नऊ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे; तर आणखी एका आरोपीचा भिवंडी-वाड्यात शोध सुरू आहे. पर्यटनाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.