नाशिक – इगतपुरी येथील भावली धबधबा परिसरात झालेल्या वादातून वाहनाचा १० ते १२ किलोमीटर पाठलाग करून पर्यटकांवर हल्ला चढविल्याच्या प्रकरणात नऊ संशयितांना न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भावली धरण परिसरात संशयितांची धिंड काढण्यात आली. या प्रकरणात आणखी दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संशयितांनी पर्यटकांच्या मोटारीचा पाठलाग करताना काही दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला होता. यातील काही वाहने ताब्यात घेतली गेली असून उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे.
रविवारी भावली धरण परिसरात ही घटना घडली होती. नाशिकमधील कुटुंबिय फिरण्यासाठी तिथे गेले होते. तेव्हा एका तरुणाने महिलेची छेड काढली. त्याबद्दल जाब विचारल्यानंतर टोळक्याने कुटुंबाला धक्काबुक्की केली. यामुळे घाबरून हे कुटुंब आपल्या मोटारीतून नाशिककडे निघाले असता टोळक्याने मोटार आणि दुचाकींवरुन त्यांचा सुमारे १२ किलोमीटर पाठलाग करून मोटारीवर बेसबॉल स्टिक, सळई, दांडके, रॉडने मारून तोडफोड केली होती. थरारक पाठलाग व हल्ल्याच्या चित्रफिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
या घटनेमुळे सुरक्षित पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवत नऊ जणांना अटक केली. यात इगतपुरी तालुक्यातील विशाल भटाटे (२७, गिरणारे), अनिकेत मानवेढे (२४, गिरणारे), सागर उर्फ लोकेश गिते (२२, माणिक खांब), अनिरुद्ध भागडे (२५, नांदगाव सदो), विनोद बोराडे (२६, इगतपुरी गावठाण), अर्जुन आडोळे (२५, माणिक खांब), सचिन आडोळे (२९, माणिक खांब)आणि देविदास भगत (२५, बलायदुरी), अजय दालभगत (२०, देवळे घोटी) यांचा समावेश आहे.
दोन, तीन संशयितांचा शोध सुरू
बुधवारी अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने नऊ संशयितांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपींना गुन्ह्यात मदत करणारे, आश्रय देणारे व पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही गुन्ह्यात समाविष्ट केले जाणार असल्याचे पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन, तीन जण फरार असून त्याचा शोध सुरू आहे. संशयितांनी पर्यटकांचा पाठलाग करताना दोन मोटार आणि दोन मोटरसायकलचा वापर केला होता. यातील प्रत्येकी एक मोटार व दुचाकी जप्त करण्यात आली असून उर्वरित वाहनांचा शोध घेतला जात असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांकडून देण्यात आली.
