नाशिक : महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे आर्थिक व्यवहार आणि राज्यातील १०० कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता आ्दींशी संबंधित दस्तावेज, माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिली आहे. त्यामुळे खरातशी आर्थिक हितसंबंध राखणारे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत.

भोंदूबाबा खरात प्रकरणी मंगळवारी प्रथमच एसआयटीकडून माहिती देण्यात आली. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खरातविरुध्द एकूण १२ गुन्हे दाखल असून त्यापैकी नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करीत आहे. उर्वरित दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर तर, एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलिसांकडे आहे. खरातविरुद्ध नसलेल्या परंतु, या विषयाशी संबंधित दोन गुन्ह्यांचा तपास एसआयटी करीत असल्याचे पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खरातची मालमत्ता, त्याचे आर्थिक व्यवहार यांची ईडीने दाखल घेतली असून ईडीने मागितलेली सर्व माहिती एसआयटीकडून देण्यात आली आहे. खरातच्या सीडीआर प्रकरणाचा तपास शासन करीत आहे.

महिला अत्याचार प्रकरणाच्या चौेकशीत तक्रारदार आणि साक्षीदारांकडून मिळणारी माहिती, तसेच त्यासंदर्भातील पुराव्याच्या आधारे कोणी सहआरोपी आहे का, याचा तपास केला जात आहे. पुरावे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सातपुते यांनी सूचित केले. पीडितांमध्ये कोणी अल्पवयीन नाही. आतापर्यंत ३० पेक्षा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

आक्षेपार्ह ४६५० लिंक्स हटविण्याची कारवाई

पीडितांविषयी आक्षेपार्ह चित्रफितींसंदर्भातील ४६५० लिंक्स एसआयटीच्या सायबर चमूने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने काढून टाकल्या आहेत. समाज माध्यमात आक्षेपार्ह चित्रफिती, माहिती पुन्हा पुन्हा टाकणारी ४५१ खाती कायमस्वरुपी काढून टाकण्यात आली आहेत. पीडितांच्या आक्षेपार्ह चित्रफिती प्रसारित केल्या प्रकरणी आतापर्यंत नाशिकचे सातपूर आणि अहिल्यानगर येथील कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणात सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे