नाशिक – महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत नाशिक येथील न्यायालयाने २९ मार्चपर्यंत वाढ केली आहे. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात अनेक धक्कादायक बाबी मांडून अधिक तपासासाठी पोलीस कोठडीत मागणी करण्यात आली. मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी काही जण खरातवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले.
महिला अत्याचार प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतर अशोक खरातने त्याच्या कार्यालयात अत्याचार केले. या विरोधात पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी खरातला अटक झाल्यानंतर त्याचे कारनामे समोर येऊ लागले. खरातच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केल्यानंतर पीडिता तक्रारीसाठी पुढे येऊ लागल्या.
गर्भवती महिलेवर बाळाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने अत्याचार करण्यात आले. एका प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तीन पीडितांनी यासारखीच पोलिसांकडे कैफियत मांडली. या प्रकरणी आतापर्यंत खरातविरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावलेल्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. विशेष तपास पथकाने संशयित खरातला दुपारी न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाच्यावतीने तपासात समोर आलेल्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या. संशयित खरातकडे हरणाची काळी व पांढरी कस्तुरी सापडली. त्याने ती कुठून आणली याचा तपास करावयाचा आहे.
संशयिताकडे पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे आणि पाच रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. पिस्तुलीचा वापर संशयिताने नरबळी देण्यासाठी केल्याचा संशय व्यक्त करीत या सर्व बाबींचा सखोल तपास होण्यासाठी पोलीस कोठडीत वाढविण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली. खरातच्या वकिलांनी त्यास विरोध केला. यावर दोन्ही बाजुकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने खरातची पुन्हा २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
खरातचा पाय खोलात
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय अधिक खोलात जात आहे. त्याच्याकडे पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे आणि पाच वापरलेल्या काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या मिळाल्या असून संशयिताने पिस्तुलचा वापर जिवितहानी, खून अथवा नरबळी देण्यासाठी केल्याचा संशय असून याचा तपास करणे बाकी असल्याचा मुद्दा तपास यंत्रणेने मांडला. या गुन्ह्यात संशयिताला इतर कोणी मदत केली याचा तपास करावयाचा आहे.
संशयित भोंदूबाबाने लोकांना दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र, तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली आणखी गैरप्रकार केल्याची शक्यता आहे. या बाबत तपास करण्यासाठी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
