नाशिक – आगामी सिंहस्थाचा काळ लक्षात घेऊन नोकरी लावून देणे तसेच आपत्कालीन संरक्षण, सुरक्षिततेविषयी प्रशिक्षणाचे कारण पुढे करत काही संशयित सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी भोंसला संस्थेच्या नावाने पैसे उकळत असल्याचे समोर आले. यासंदर्भात संस्थेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अशाप्रकारे सीएचएमई भोंसला संस्थेच्या नावाचा वापर करून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीपासून नागरिकांनी सावध रहावे, कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन संस्थेने केले आहे.

याबाबत दिलेल्या तक्रारीत पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या मागे कार्यालय असल्याचे सांगून प्रीती चव्हाण यांनी एसपी लेबर कॉन्टॅक्टर या फर्मच्या माध्यमातून आगामी सिंहस्थ लक्षात घेऊन सफाई कामगार, परिचारिका, आया, वॉर्डबॉय, डॉक्टर, जलपटू, अग्निशमन दल, वाहनतळ, सुरक्षारक्षक, ट्रॅफिक पोलीस मदत, आचारी, जीवरक्षक अशा पदांसाठीची एक जाहिरात प्रतिमा तयार केली आहे. यापैकी अग्नीवीर पदांचे प्रशिक्षण हे संस्थेच्या भोंसला मिलिटरी स्कूल येथे दिले जाणार असल्याचे नमूद केले आहे.

अशा पध्दतीने संस्थेचे नाव आणि प्रतिष्ठेचा गैरवापर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित व्यक्तीकडून संस्थेच्या नावाचा अनधिकृत वापर करण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले जात आहेत. संबंधित व्यक्तीला संस्थेकडून कोणतीही परवानगी किंवा अधिकार देण्यात आलेले नाहीत. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असून संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, संस्थेच्या नावाचा होणारा गैरवापर थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संस्थेने अर्जात केली आहे.

सावधानता बाळगण्याचे आवाहन

संबंधित व्यक्तीने तयार केलेल्या जाहिरात प्रतिमेतील भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता प्रीती चव्हाण या नावाने व्यक्ती बोलत होती. तिने अग्निवीर कोर्सेचे शुल्क २०६० रुपये असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती आमच्या संस्थेचे नाव वापरत अशी सूचना देत होती की कोर्सचे प्रशिक्षण हे भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये असेल. तेथे राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच संबंधित व्यक्तीने आपण शुल्कापोटी जे पैसे द्याल, त्याची पावती मिळणार नाही. कारण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम असल्याचे सांगितले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. नाशिककरांना असे फोन आल्यास सावधानता बाळगावी. असे आवाहन संस्थेने केले आहे.