नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याअंतर्गत इगतपुरी-भुसावळ रेल्वेमार्गावरील कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचना कामासाठी ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी काही मेमू आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या परिचालनावर परिणाम होणार असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे प्रवासाचे ठिकाण बदलण्यात आले असून, काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम रेल्वे परिचालनासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कसबे सुकेणे आणि खेरवाडी येथे यार्ड पुनर्रचना करण्यात येणार आहे
सहा मेमू गाड्या रद्द
३० सप्टेंबर रोजी सहा मेमू गाड्यांचे परिचालन रद्द करण्यात आले आहे. यामध्ये देवळाली-भुसावळ ११११३ मेमू, भुसावळ-देवळाली ११११४ मेमू, इगतपुरी-भुसावळ ११११९ मेमू, भुसावळ-इगतपुरी १११२० मेमू, बडनेरा-नाशिक ६११३० मेमू आणि नाशिक-बडनेरा ६११२९ मेमूचा समावेश आहे. या सर्व गाड्या त्यांच्या संबंधित प्रस्थान स्थानकांवरून रद्द राहतील
जनशताब्दीचा प्रवास मनमाडपर्यंत
नॉन-इंटरलॉकिंग कामाचा परिणाम जनशताब्दी एक्स्प्रेसच्या सेवेवरही होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी हिंगोली डेक्कनहून सुटणारी १२०७२ हिंगोली डेक्कन-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. त्यामुळे मनमाड ते मुंबईदरम्यान तिचा प्रवास रद्द राहील. त्याचप्रमाणे १२०७१ मुंबई-हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईऐवजी मनमाड येथून नियोजित वेळेनुसार सुटेल. या गाडीचा मुंबई ते मनमाडदरम्यानचा प्रवास रद्द राहणार आहे.
पाच एक्स्प्रेसचे मार्ग बदलले
नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. २८ सप्टेंबर रोजी धनबादहून सुटणारी १३३७९ धनबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे आणि लोणावळा मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २९ सप्टेंबर रोजी गोरखपूरहून सुटणाऱ्या १५०६५ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ११०५६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस यांनाही याच मार्गाने वळविण्यात आले आहे.याचबरोबर २२८६६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसलाही अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे आणि लोणावळा मार्गे चालविण्यात येणार आहे. तर ३० सप्टेंबर रोजी मुंबईहून सुटणारी १२५३४ मुंबई-लखनौ एक्स्प्रेस लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन आणि अंकाई मार्गे लखनौला पोहोचेल
सात गाड्या मार्गात नियंत्रित
३० सप्टेंबर रोजी काही गाड्यांना त्यांच्या मार्गावर ठरावीक कालावधीसाठी नियंत्रित करण्यात येणार आहे. १२१४२ पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस भुसावळ-निफाडदरम्यान एक तास २५ मिनिटे, तर १२२९४ प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस एक तास नियंत्रित करण्यात येईल. १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि १२३३५ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस प्रत्येकी तीन तास भुसावळ-निफाडदरम्यान नियंत्रित राहतील. दुसरीकडे, ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस आणि १२३६२ मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस इगतपुरी- नाशिकदरम्यान प्रत्येकी एक तास १५ मिनिटे, तर ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस एक तास १० मिनिटे नियंत्रित करण्यात येईल.रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पायाभूत सुविधांची देखभाल आणि रेल्वे परिचालनाची सुरक्षितता यासाठी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक आवश्यक आहे. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
