नाशिक – सध्या गणेशोत्सवात डीजे हवा की नको, यावरुन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पुण्यातील विद्यानंद बापट या सामाजिक कार्यकर्त्याने डीजेमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि गणेशोत्सवासह इतर कोणत्याही उत्सवात रस्त्यांवर मंडप टाकण्यामुळे होणाऱ्या कोंडीवरुन प्रखरपणे विरोधाची भूमिका मांडल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बापट यांना समर्थन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विरोधाची भूमिका न मांडता तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. भाजपचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही डीजेवर थेट बंदीची मागणी न करता नियमांमध्ये डीजे वाजविण्यास हरकत नसल्याचे सांगितले. दुसरीकडे, भाजपचेच नाशिक महानगर अध्यक्षांनी मात्र मंत्री महाजन यांच्या मताविरुध्द भूमिका घेत डीजे आणि लेझर शो बंद झाले पाहिजेत, अशी भूमिका घेतल्याने भाजपमध्येच या विषयावर मतभिन्नता असल्याचे आढळून येत आहे.
गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात डीजे वाजविण्यावरुन निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात अनेक नागरिक पुढे येऊ लागले आहेत. यासंदर्भात पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी घेतलेली विरोधाची भूमिका महत्वपूर्ण ठरली. कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता अतिशय मुद्देसुदपणे गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास विरोध केला. त्यांच्या या भूमिकेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विरोध होत आहे. त्यात भाजप, शिवसेनेशी संबंधित गणेशोत्सव मंडळांचाही समावेश आहे. गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास काही शहरांमध्ये तेथील पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. काही शहरांमध्ये काही निर्बध घालण्यात आले आहेत. डीजेमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, गणेशोत्सव साजरा करण्यामागील हेतू, हे सर्व मुद्दे विद्यानंद बापट यांनी अतिशय प्रखरपणे आणि परखडपणे मांडले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे समाजातून अनेकांनी स्वागत केले आहे. त्यात काही कलाकार आणि राजकारणी मंडळींंचाही समावेश आहे.
गिरीश महाजन म्हणतात, नियम पाळून डीजे वाजवा
यासंदर्भात नाशिक येथे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी, न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे आणि आवाजांच्या मर्यदांचे पालन करुन डीजे वाजविण्यास हरकत नसल्याचे सांगितले. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची वस्तुस्थिती असल्याचे मान्य करतानाच सण आणि उत्सव यांचेही महत्व असल्याचे त्यांनी मांडले. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणावरील आवाजामुळे त्रास होणार नाही, याची काळजी सार्वजनिक गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज मंत्री महाजन यांनी व्यक्त केली.
नाशिक महानगर अध्यक्ष म्हणतात, डीजेवर बंदीच हवी
मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेविरोधात वेगळे मत नाशिकचे महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी मांडले आहे. डीजे किंवा गाण्यांचा आवाज किती असावा याबाबत नियमावली आहे. परंतु, काही अतिउत्साही मंडळी ऐकत नाहीत.आपल्याच मंडळाकडे लोक कसे आकर्षित होतील, याकरिता असे लोक डीजे आणि गाण्यांचा कानठळ्या बसतात व छातीत धडधड होईल, इतक्या मोठ्या आवाजात कार्यक्रम करतात.लेझर शो बाबतही असेच आहे.डोळ्यांना इजा होतील, अशा प्रकारे लेझर शो दाखवतात. हे सर्व बंदच झाले पाहिजे. त्यापेक्षा पारंपरिक वाद्ये वाजवून उत्सव साजरे केले पाहिजेत. वास्तविक आवाज किती डेसिबल असावा, याबाबत नियमावली आहे. त्यापेक्षा जास्त आवाज आढळल्यास पोलिसांनी तात्काळ त्याच ठिकाणी आवाज बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांकडे लोकांनीही फिरकता कामा नये. अघोषित बहिष्कार टाकावा. निषेध करावा, जनजागृती करावी, जेणेकरून अशा अतिउत्साही मंडळींना अद्दल घडेल, अशी कठोर भूमिका सुनील केदार यांनी मांडली आहे.
