नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून थांबवलेली पक्ष भरती मोहीम स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होताच भाजपने पुन्हा सुरु केली आहे. इगतपुरीचे माजी नगराध्यक्ष शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे कट्टर संजय इंदूलकर, चांदवडचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष कोतवाल, सिन्नरचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) उदय सांगळे, दिंडोरी तालुक्यात माजी आमदार रामदास चारोस्कर ही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेली काही नावे आहेत. त्यातच आता शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार खासदार राजाभाऊ वाजे यांनाच भाजपने धक्का दिला आहे.

नाशिक शहरातील भाजपच्या वसस्स्मृती या कार्यालयात शुक्रवारी झालेला पक्ष प्रवेश सोहळा सर्वाधिक चर्चेचा राहिला आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याने सिन्नर नगरपालिका ताब्यात घेण्याची भाजपने पुरेपूर तयारी केल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका तथा सिन्ररचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्यासाठी भाजपने केलेली व्यूहरचना शुक्रवारी फळास आली. हेमंत वाजे यांनी काही माजी नगरसेवकांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सिन्नर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हेमंत वाजे इच्छूक होते. परंतु, त्यांचाच प्रवेश करुन घेत भाजपने खासदार राजाभाऊ वाजे यांना संकटात टाकले आहे. हेमंत वाजे यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई वाजे या आमदार राहिल्या आहेत. त्यांचे वडील दिवंगत विठ्ठल वाजे हे सिन्नरचे मगराध्यक्ष होते. याआधी भाजपने राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री ॲड. माणिक कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे यांना पक्षात घेऊन माणिक कोकाटे यांना धक्का दिला आहे.आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्यापुढील अडचणी वाढविल्या आहेत.

दरम्यान, सिन्नर नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप एकत्रितपणे लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिन्नरमध्ये अजित पवार गटाची भूमिका काय राहणार, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना ठाकरे गट काँग्रेस, राष्ट्रवादीचा शरद पवार गय यांना बरोबर घेऊन निवडणकीला सामोरे जाईल काय, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपने सिन्नरमध्ये वाजे आणि कोकाटे यांचे घर फोडल्याचे आरोप होऊ लागले आहेत. हेमंत वाजे यांच्या पक्ष प्रवेशावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी, वाजेंचा पायगुण चांगला असल्याने बिहारमध्ये घवघवीत यश पक्षाला मिळाले आहे. आता सिन्नरमध्येही शंभर टक्के विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हेमंत वाजे यांनी, सिन्नरमधील समस्या भाजपच सोडवू शकेल, अशी खात्री वाटल्याने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नमूद केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश पदाधिकारी विजय साने, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, सुनील बच्छाव, माजी महापौर सतीश कुलकर्णी, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, उदय सागळे, बंडुनाना भाबड, भरत कोकाटे, तेजस्वीनी वाजे आदी उपस्थित होते.