नाशिक – नाशिक महापालिका निवडणुकीपासून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात वाद सुरु आहेत. निवडणूक निकालानंतर शांत राहिलेला वाद आता पुन्हा एका कार्यक्रमाचे निमित्त होऊन उफाळून आला आहे. महापालिका निवडणुकीआधी भाजपशी एकनिष्ठ राहिलेले मुकेश शहाणे आणि शिवसेनेचा ठाकरे गट सोडून भाजपमध्ये दाखल झालेले सुधाकर बडगुजर हे दोघे एकाच पक्षात राहू शकत नव्हते. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे अखेर महापालिका निवडणुकीत भाजपचे तिकीट न मिळाल्याचे निमित्त होऊन मुकेश शहाणे हे अपक्ष लढले. आणि विजयीही झाले. आता बडगुजर आणि शहाणे या वादाचा नवीन अध्याय रंगला आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमित्त होऊन बडगुजर-शहाणे यांच्यातील संघर्षाला फोडणी मिळाली. सिडकोतील महालक्ष्मी मित्र मंडळ आणि छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुकेश शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांचे थेट नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. “सलीम कुत्ताबरोबर नाचणारा आता भगव्याखाली आला असून उद्या हिंदूंचा घात करेल, “असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यावर सुधाकर बडगुजर यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. परंतु, त्यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि समर्थक नगरसेवकांनी सोशल मीडियावरून शहाणे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. बडगुजर समर्थकांकडून जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली जात आहे. दीपक बडगुजर यांनी एका चित्रफितीतून, “एक मोकाट कुत्रे भुंकून गेले. तो कुत्रा ज्या केसबद्दल बोलत होता.
त्यामध्ये कुठलेही पुरावे नसल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे “, असे म्हटले आहे. ज्याचा मागील काळात ‘कायद्याचा बालेकिल्ला’ झाला,अशा लोकांनी आम्हाला हिंदत्व शिकवू नये. आम्ही कायद्याचा सन्मान करतो. पण तरीही गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार अशी बेताल वक्तव्य करत असतील तर जशाच तशे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. बडगुजर समर्थक नगरसेविका साधना मटाले यांनीही शहाणे यांना लक्ष्य केले. सोशल मीडियावर त्यांनी शहाणे यांच्यावर टीका केली. गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीने आपल्या वक्तव्यांवर नियंत्रण ठेवावे. सिडकोतील वातावरण खराब करण्याचे काम सुरू असून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, महालक्ष्मी चौक येथे आयोजित सभेला अंबड पोलिसांनी परवानगी नाकारली होती, असे समजते.
भाजपचे दीपक बडगुजर आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात महापालिका निवडणुकीआधी सोशल मीडियावर वाद रंगला होता. पुढे महापालिका निवडणुकीदरम्यान शहाणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही. आपणास बडगुजर यांच्यामुळेच उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला होता. त्यानंतर शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी करुन निवडणूक जिंकली. शहाणे-बडगुजर वाद भविष्यात कोणते वळण घेईल, हे सध्या सांगता येणे कठीण आहे.
