नाशिक – भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकफडकी राजीनामा दिल्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेत पक्षाने बहुमत मिळवले. निवडणुकीत लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना फारसे विचारात घेतले गेले नसल्याची स्थानिक पातळीवर भावना आहे. निकालानंतर ही अस्वस्थता शहराध्यक्षांच्या राजीनाम्यातून समोर आल्याची चर्चा आता पक्षाच्या वर्तुळात होत आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीची संपूर्ण सूत्रे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती. १०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला ७२ जागा मिळाल्या. बहुमत मिळाले असले तरी वेगवेगळ्या कारणांनी काही जागा हातातून गेल्या. मंगळवारी मंत्री महाजन यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी नावे जाहीर केली आणि दुसऱ्याच दिवशी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले. महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यांना विचारात न घेता मंत्री महाजन यांनी अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीर नाराजी प्रगट केली होती. पुढे एबी अर्ज वाटपात गोंधळ झाला. काही अर्जांची पळवापळवी झाल्यामुळे शिस्तबद्ध पक्षातील सावळागोंधळ उघड झाला. या घटनेची पक्षाने गंभीर दखल घेऊन चौकशी केली. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सविस्तर अहवाल पाठविला होता.

निकालानंतर अलीकडेच शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापालिकेत मित्रपक्षांनी भाजप सोबत काम करावे, असे आवाहन केले होते. प्रारंभी मंत्री महाजन यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढून होते. नाशिक महापालिकेत आम्ही एकत्रित लढलो नाही. स्वबळावर भाजपला ७२ जागा मिळाल्या. नाशिकमध्ये आम्हाला कुबड्यांची गरज नाही. मित्रपक्षांना सोबत घेण्याविषयी कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा काही प्रस्ताव नसल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले होते. तेव्हा शहराध्यक्ष केदार हे मंत्री महाजन यांच्या समवेत होते. यानंतर दोन दिवसांत खुद्द मंत्री महाजन यांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागला. केंद्र व राज्याप्रमाणे महापालिकेत महायुतीने एकत्रित काम करावे, असे वरिष्ठ नेत्यांना वाटते. कुंभमेळा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वरिष्ठ नेत्यांचे तसे म्हणणे आहे. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेण्याबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो मान्य केला जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

या घडामोडी घडत असताना बुधवारी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. पक्षातील मंडळी त्याचा संबंध मंत्री महाजन यांच्या कारभाराशी जोडत आहे. कुणालाही विश्वासात न घेण्याच्या मंत्री महाजन यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षातील अनेक जण नाराज असल्याची चर्चा होत आहे. सुनील केदार यांच्या राजीनाम्यातून ही खदखद समोर आल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.