नाशिक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वारंवार सापळे रचूनही शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकांचे लाच घेण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, गलेलठ्ठ वेतन घेणारे अधिकारीही जेव्हां हजार, दोन हजार रुपयांची लाच बिनदिक्कतपणे स्वीकारतात, तेव्हां आश्चर्य वाटते. नाशिक जिल्ह्यात अलिकडे लाच स्वीकारणारे काही जण ताब्यात आले. तर, काही जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात आता इगतपुरी तालुक्यातील एका प्रकरणाचा समावेश झाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील या प्रकरणात एका शासकीय ठेकेदाराने धारगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ई-निविदा प्रक्रियेद्वारे सुमारे १३ लाख ७० हजार रुपयांची सहा विकासकामे पूर्ण केली, त्या कामांमध्ये नळपुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय आणि भूमिगत गटार या कामांचाही समावेश आहे. सर्व कामे १३ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची असताना पाच कामांचे नऊ लाख ७० हजार रुपयांचे देयक ठेकेदाराला मिळाले.

उर्वरित कामाचे देयक मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक बाळू अंतु मांगटे (४५) याने पाच टक्के दलालीप्रमाणे ४८ हजार रुपयांची मागणी शासकीय ठेकेदाराकडे केली. या मागणीमुळे शासकीय ठेकेदार हादरला. विशेष म्हणजे लाच न दिल्यास उर्वरित देयक मंजूर न करण्याची धमकी ग्रामसेवकाने दिली. ग्रामसेवकाकडून झालेल्या मागणीला वैतागून ठेकेदाराने १३ जुलै रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली, त्यावेळी ग्रामसेवकाने लाच मागितल्याचे उघड झाले. पथकाने मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात ग्रामसेवकाला जाळ्यात सापडविण्यासाठी सापळा रचला. दुसरीकडे, ग्रामसेवक बाळू मांगटेने सरपंचांचे पती पांडुरंग देवराम पुंजारा (२३) यांना लाच स्वीकारण्यास तयार केले. त्यानंतर खासगी व्यक्ती शांताराम सोनू पादीर (३८) याच्यामार्फत ग्रामसेवकासाठी ४८ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना संशयिताना पकडण्यात आले.

लाचप्रकरणी तीनही संशयितांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधकचे पोलीस अधीक्षक आणि अपर अधीक्षक, तसेच पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. या कारवाईत सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशीकर आणि हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील अलिकडेच घडलेल्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकांसह तिघांविरुध्द लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.