नाशिक – आंतरजातीय लग्न केल्याने जातपंचायतीकडून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे पाच वर्षांपासून ती माहेरी जाऊ शकली नाही. परंतु, येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रबोधनपर कार्यक्रमात चित्रकथी जात पंचायत बरखास्त करण्यात आली. तिच्यावर लादलेले निर्णयही रद्द करण्यात आल्याने तिला भावाच्या लग्नासाठी माहेरी जाता आले. यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी विशेष प्रयत्न केले.
भटके विमुक्तात मोडणाऱ्या चित्रकथी समाजातील असलेल्या तिच्या अंगावर सफेद डाग आहेत. अशा स्त्रीला धार्मिक कार्यात कोणी बोलावत नाही, अशी अंधश्रध्दा आहे. त्यामुळे तिच्याशी जातीतील कोणीाही लग्नासाठी तयार नव्हता..मग तिने नवबौद्ध समाजातील व्यक्तीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. तिच्या समाजात मुलीला आंतरजातीय विवाह करण्यास बंदी होती . त्यामुळे तिच्या चित्रकथी जातपंचायतीने तिला आणि तिच्या परिवाराला जात बहिष्कृत केले. तिच्या परिवाराने ५१ हजार रुपये दंड भरून जातीत प्रवेश मिळवला. परंतु, तिच्यावरील बहिष्कार कायम राहिला.
या बहिष्कारामुळे ती पाच वर्षापासून आपल्या माहेरी जाऊ शकली नाही. भावाच्या लग्नाला उपस्थित राहू द्यावे, अशी कैफियत तिने जात पंचायत मूठमाती अभियानाचे (अंनिस) राज्य कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांच्याकडे मांडली. चांदगुडे यांनी महिलांसाठी ठोस काम करणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मदत घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी पोलीस महानिरक्षकांरबरोबर बैठक घेतली. त्यानुसार त्यांनी नंदुरबार पोलीस अधीक्षकांना तिला सुरक्षा पुरवून तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहता यावे, यासाठी मदत करण्याचे आदेश दिले .
त्याप्रमाणे अक्कलकुआ पोलीस ठाण्यात जातपंचायतीच्या पंचांना बोलावून त्यांच्याकडून तिने लग्नास येण्यास अडसर नसल्याचे लिहून घेतले. अंनिसने पंचांशी एका बाजूने सुसंवाद साधत व दुसऱ्या बाजूने कायद्याचा धाक दाखवत जात पंचायत बरखास्त करण्याची विनंती केली पंचांनी मोठ्या मनाने त्यास होकार दिल्याने नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात चित्रकथी जातपंचायत बरखास्त करण्यात आली.
आंतरजातीय विवाहांना परवानगी देण्याचे ठरले. भावाच्या लग्नास ती उपस्थित राहिली. आईवडील, भाऊ , बहीण आणि इतर नातेवाईकांना ती पाच वर्षानंतर प्रथमच भेटली. समाजाने सन्मानपूर्वक तिचा स्वीकार केला. तिच्यावरील बहिष्कार उठविला गेला. याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. मदत करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले.
आपल्या लढ्याला यश आले असून भावाच्या लग्नात हजर राहिल्याचा मोठा आनंद आहे. सर्व नातेवाईक खूप चांगले बोलले. येणाऱ्या काळात समाजातील कूप्रथांविरोधात लढणार आहे, असा निर्धार तिने व्यक्त केला आहे.
