नाशिक: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, चार प्रमुख रस्ते आणि सात उपरस्ते एकत्र येणाऱ्या द्वारका या अतिशय वर्दळीच्या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या २१४ कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या चौकात अवजड वाहने, खासगी प्रवासी बस, एसटी आणि सिटीलिंक बसेसना पुढील तीन महिने प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या सिटीलिंक बसेसच्या वाहतूक मार्गात मोठे बदल झाले आहेत.

​द्वारका चौकातील भुयारी मार्गाच्या कामासाठी वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, द्वारकामार्गे ये-जा करणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या मार्गात बदल करण्यात आले. त्यानुसार नाशिकरोड ते निमाणी जाणाऱ्या बसेसचा मार्ग आता नाशिकरोड, विजय ममता सिग्नल, अशोका मार्ग, आम्रपाली टॉवर, कल्पतरूनगर, अशोका शाळा, लक्ष्मी माता चौक, भारत नगर, सह्याद्री हॉस्पिटल, आयेशा नगर, मुंबई नाका, उर्दू शाळा, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार, सीबीएस, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा मार्गे निमाणी असा असणार आहे.

​तसेच निमाणी ते नाशिकरोड जाणाऱ्या बसेसचा मार्गही बदलला आहे. निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार, सारडा सर्कल, उर्दू शाळा, जिल्हा उपनिबंधक, कोर्ट यार्ड, वाणी हाऊस, आयेशानगर, भारतनगर, लक्ष्मी नारायण चौक, अशोका मार्ग, विजय ममता सिग्नल, आंबेडकर नगरमार्गे नाशिकरोड असा हा मार्ग असेल.

​काही थांबे बंद…

​वाहतुकीतील बदलामुळे सद्यस्थितीतील सिद्धार्थ हॉटेल, पौर्णिमा, द्वारका आणि वडाळा नाका हे थांबे बंद होतील. तर विजय ममता सिग्नल, अशोका मार्ग, आम्रपाली टॉवर, कल्पतरूनगर, अशोका शाळा, लक्ष्मी माता चौक, भारतनगर, सह्याद्री रुग्णालय, आयेशा नगर, मुंबई नाका आणि उर्दू शाळा हे नवीन थांबे असतील.

​‘निमाणी’ ऐवजी ‘तपोवन’मधून सिटीलिंक सुटणार

​एसटी महामंडळाच्या काही बसेस निमाणी बसस्थानकातून मार्गस्थ होणार असल्याने, पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार शनिवारपासून निमाणी येथून सुटणाऱ्या सिटीलिंकच्या सर्व बसेस तपोवन बस डेपो येथून सुटणार आहेत. तसेच निमाणी परिसरात संभाव्य कोंडी टाळण्यासाठी निमाणी येथे सिटीलिंकची कोणतीही बस थांबणार नाही. या बसेस पंचवटी डेपो कॉर्नरनंतर थेट पंचवटी कारंजा किंवा पंचवटी कारंजानंतर थेट पंचवटी डेपो कॉर्नर येथे थांबतील, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. ​निमाणी येथून सुटणाऱ्या सिटीलिंकच्या बसेस स्थलांतरित केल्या जाणार असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी निमाणी बसस्थानक येथील पास केंद्रात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ज्या प्रवाशांना पास काढायचा आहे, ते निमाणी बसस्थानक येथूनच पास घेऊ शकतात. याबाबात अधिक माहिती हवी असल्यास ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.