नाशिक – नाशिक महानगरपालिकेकडून शहरासाठी परिसरातील नागरिकांसाठी सिटीलिंक ही शहर बससेवा चालविली जाते. ही बससेवा महानगरपालिकेची असली तरी तिचा लाभ शहराच्या ह्द्दीपासून २० किलोमीटरपर्यंतच्या अंतरात येणाऱ्या गावांनाही होत आहे. यापैकी काही गावे महानगरपालिकेच्या अखत्यारित येत नसतानाही त्यांना सिटीलिंकचा लाभ होतो. त्यामुळेच सिटीलिंकचे महत्व ज्याप्रमाणे नाशिकमधील नागरिकांना आहे,त्याचप्रमाणे परिसरातील गावांनाही आहे. परंतु, सिटीलिंक या शहर बससेवेला एक वेगळीच समस्या भेडसावत आहे.
सिटीलिंक बससेवेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अर्थात, अशा प्रवाशांवर सिटीलिंककडून कारवाईही केली जात आहे.
कोणत्याही मोठ्या शहासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्वाची ठरते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जितकी मजबूत, त्याप्रमाणे त्या शहरातील नागरिकांना सोयीचे होते. तसेच शहराच्या विकासालाही त्यामुळे हातभार लागतो. हे ध्यानात घेऊनच नाशिक महानगरपालिकेने सिटीलिंक ही शहर बससेवा सुरु केली आहे. सिटीलिंक शहर बससेवेव्दारे दररोज मोठ्या प्रमाणावर कामगार, नोकरदार, विद्यार्थी तसेच इतर प्रवासी प्रवास करीत असतात. एखाद्यावेळी सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप केल्यास या सर्व प्रवाशांचे हाल होतात.
इतकी सिटीलिंकची सेवा नागरिकांच्या सवयीची झाली आहे. सिटीलिंकमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी सिटीलिंकने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दीड वर्षात १८..६५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षात ८५० प्रवाशांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. सिटीलिंककडून त्यांना सेवा देणाऱ्या खासगी एजन्सीवरही सेवा करारातील अटींचे उल्लंघन केल्याने ४२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून २०२१ पासून सिटीलिंक बससेवा चालविली जाते. सिटीलिंकमार्फत नाशिक शहरासह शहर हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंत बससेवा पुरविली जाते. या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी या बससेवेचा गैरफायदाही काही जणांकडून घेतला जातो. या बससेवेतंर्गत फुकट करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे अशा पध्दतीने प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
भरारी पथकांनी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या एका वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.३ लाख रुपये, तसेच एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात ७.६१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षात खासगी एजन्सीकडून २७.७० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. खासगी एजन्सीकडून दंड वसूल करण्याचे कारण म्हणजे सेवा करारातील अटींचे उल्लंघन होय. त्यांच्याकडून एकूण ४२.३१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बेशिस्तपणे सेवा देणे, नियमांचे पालन न करणे, त्रुटींचे प्रमाण वाढणे, अटींचे उल्लंघन आदी प्रकार यापुढेही आढळल्यास संबंधित एजन्सीवरही दंड आकारला जाणार असल्याचे सिटीलिंकने कळविले आहे.
