जळगाव : महापालिकेच्या ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या १२ उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड निश्चित झाली असून, उर्वरित ६३ जागांसाठी आता भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) कंबर कसली आहे. दरम्यान, स्वपक्षातीलच काही बंडखोरांनी आव्हान दिल्यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता महायुतीला काही ठिकाणी मोठा फटका बसू शकतो, अशी कबुली भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विशेषतः सत्ताधारी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा आपल्याच पक्षातील नाराज आणि बंडखोर उमेदवारांचा अधिक धसका घ्यावा लागत आहे. बंडखोरांमुळे अनेक प्रभागांतील निवडणुकीची गणिते पूर्णपणे बदलली असून, सत्ताधारी पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महापालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी तब्बल २२ जागांवर अपक्ष उमेदवारांनी थेट लढत निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या अपक्ष उमेदवारांमध्ये सत्ताधारी तसेच प्रमुख राजकीय पक्षांतील बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजप आणि शिवसेना मिळून १४ बंडखोर उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची चिंता वाढली असून, अनेक ठिकाणी मत विभाजनाची भीती अधिकृत उमेदवारांना सतावत आहे.

पक्षाकडून तिकीट न मिळाल्याची नाराजी, स्थानिक पातळीवरील गटबाजी तसेच प्रभागनिहाय राजकीय समीकरणांमुळे अनेक इच्छुकांनी पक्ष शिस्त झुगारून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. काही प्रभागांमध्ये बंडखोर उमेदवारांची स्थानिक पातळीवर चांगली पकड असल्याने ते अधिकृत उमेदवारांना कडवी टक्कर देत आहेत. परिणामी, सत्ताधारी महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर बंडखोरी रोखणे हे भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान ठरले आहे. बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यासाठी आणि नाराजांची मनधरणी करण्यासाठी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, अनेक बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पक्षादेश झुगारून बंडखोरी करणाऱ्यांवर महायुतीकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

विशेषतः भाजपकडून तब्बल ३० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्यातून बंडखोरीला थारा दिला जाणार नाही, असा संदेश पक्ष नेतृत्वाने दिला आहे. तरीही स्थानिक पातळीवरील राजकारण आणि वैयक्तिक प्रभावामुळे बंडखोर उमेदवारांचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, यंदाच्या महापालिका निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

मत विभाजन, बदलती समीकरणे आणि अंतर्गत नाराजी यामुळे निवडणुकीचा निकाल अधिकच चुरशीचा होण्याची शक्यता असून, सत्ताधारी महायुतीसाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने अग्नी परीक्षा ठरणार आहे. या पार्श्नभूमीवर, जळगाव महापालिकेत सुरूवातीपासूनच शंभर टक्के जागा जिंकण्याची भाषा करणारे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही आता काही ठिकाणी महायुतीला फटका बसेल, अशी कबुली दिली आहे. काही जागांवर नुकसान झाले तरी महायुती ७० पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.