नाशिक – सध्या सर्वत्र मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) या कार्यक्रमाची चर्चा आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. विशेषत: प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या कार्यक्रमाची विशेष जबाबदारी आली आहे. नाशिक जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे थेट कधी आदिवासी वाड्यांवर तर कधी गावोगावी नागरिकांच्या दारी जाऊन कार्यक्रमाचा आढावा घेत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदारांच्या दारी जाणे, हा चर्चेचा विषय झाला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे लोकाभिमुख कार्यासाठी ओळखले जातात. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरुन उतर असताना त्यांना पायऱ्या चढत असलेले वृध्द दाम्पत्य दिसले. त्यांनी सहजपणे त्यांची विचारपूसकेली असता वृध्द व्यक्तीने आपली व्यथा मांडली. ही समस्या त्वरीत सोडविण्यासारखी असल्याने जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आवारातील पारावर बसून वृद्ध दाम्पत्याचा जमिनीचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कातकरी वस्ती त्यांनी गाठली. तेथे त्यांनी कातकरी बांधवांशी संवाद साधत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेत कावनई येथील सर्व पात्र मतदार आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत घरोघरी येणाऱ्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्व पात्र मतदारांनी वेळेत सहकार्य करून मतदार यादी अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले होते. तसेच जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कातकरी वस्तीवरील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी बीएलओ यांच्यासमवेत कातकरी वस्तीवरील घरोघरी भेट दिली होती.
यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येवला तालुक्यातील अंगणगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी संदीप वायाळ मुख्याधिकारी येवला नगरपालिका तुषार आहेर, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, उपअधीक्षक भूमी अभिलेख पुष्पा गाडे, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमेरसिंग पाकल व चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रथम येवला तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा कार्यक्रम कालबद्ध असल्याने सर्व कामे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर उपविभागीय कार्यालय, येवला येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महसूल विभागाच्या २६ योजनांसह घरकुल योजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
