नाशिक – दिवसाआड फुटणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या…घरातून बाहेर पडल्यावर अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकणारी वाहने…खड्ड्यांमुळे अपघातांना सामोरे जावे लागणारे नागरिक…हकनाक जीव गमावणारी कुटुंबे, आणि हे सर्व घडत असताना प्रशासनाचे निर्लज्ज मौन.
शहरातील अशी विदारक परिस्थिती मांडत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावनांना वाट करुन दिली आहे. एक नगरसेवक म्हणून आपणास वेदना होतात. लाज वाटते, अशी हतबलता व्यक्त करीत डाॅ. पाटील यांनी महापालिकेच्या कारभारावर आसूड ओढले.
कुंभमेळ्यासाठी एकाचवेळी हाती घेतलेल्या कामांमुळे शहरात सर्वत्र खोदकाम करण्यात आले. आणि नाशिक मोहेंजादारोमध्ये परावर्तीत झाले. कित्येक महिन्यांपासून खड्डेमय रस्त्यांवर तारेवरची कसरत करणाऱ्या शहरवासीयांना पावसाळ्यात भयावह स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. सद्यस्थितीत एकही रस्ता असा नाही की जिथे, खोदकाम झालेले वा खड्डे नाहीत. नाशिकच्या बिकट परिस्थितीवरून डॉ. हेमलता पाटील यांनी समाजमाध्यमातून या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर ताशेरे ओढत नाशिककरांनाही संबंधितांना जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.
जवळपास ३५ वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना अनेक सत्तांतरे पाहिली. अनेक विकास कामे पाहिली. चुका पाहिल्या, सुधारणा पाहिल्या. पण आज ज्या पद्धतीने नाशिक शहराचे वाटोळे होत आहे, तसे भयावह चित्र आयुष्यात कधीच पाहिले नाही, असे त्यांनी नमूद केले. सिंहस्थाच्या नावाखाली अनेक मोठी कामे शहराबाहेरील मक्तेदारांना दिली गेली. आणि तीच रखडली आहेत. हा विकास नव्हे तर नाशिकची नियोजनबद्ध हानी आहे. जिथे लाखो भाविक येणार आहेत, त्या रामकुंडाची आजची अवस्था विषण्ण करणारी आहे. कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होण्याची आशाही धूसर आहे. नाशिकच्या दुर्देशेची जबाबदारी कोण घेणार, ठेकेदाराच्या मलिद्यासाठी नागरिकांनी का त्रास सहन करायचा, असे प्रश्न करीत त्यांनी रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्यांना जाब विचारा, असे आवाहन केले आहे.
नियमांना तिलांजली, जबाबदारी सोडली…
कधीकाळी एका रस्त्यावर फक्त एक खड्डा खोदायचा असला, तरी किमान चार विभागांची लेखी परवानगी घ्यावी लागायची. पावसाळ्यात रस्ता खोदण्याचा प्रश्नच नव्हता. अपवादात्मक परिस्थितीतही परवानगी मिळायची नाही. परंतु, आज नियम, जबाबदारी राहिली नाही. आणि शहराची काळजीही कुणालाच नसल्याचे नमूद करत डाॅ. हेमलता पाटील यांनी सत्ताधारी, स्थानिक लोकप्रतिनिधीनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. एमएनजीएल, स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेछूट खोदकाम सुरू आहे. जेसीबीवर प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने जलवाहिन्या फुटतात, गटार वाहिन्या (ड्रेनेज) उद्ध्वस्त होत आहेत. वीज वाहिन्या तुटत असून त्याची शिक्षा नाशिककरांना भोगावी लागत असल्याकडे डॉ. पाटील यांनी लक्ष वेधले.
