नाशिक – शहरात झाड तोडण्यास हरित लवादाने मनाई केलेली असताना महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीने हरकती व आक्षेप न मागवता पाथर्डी आणि तिडके कॉलनीतील ५१७ झाडे तोडण्यास परवानगी दिली. शहरातील अनेक भागात झाडाची मुळे अशा प्रकारे मोकळी केली, की हलक्या वाऱ्यात ती पडून जातील, असे आक्षेप नोंदवत पर्यावरणप्रेमींच्यावतीने महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. ही कृती न्यायालयाचा अवमान आणि फौजदारी गुन्हा असून विविध बहाण्याने उघडी केलेली झाडांची मुळे त्वरित मातीने झाकून घ्यावीत. एखादे झाड पडल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे सूचित करण्यात आले आहे.

कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित विविध कामांसाठी चाललेल्या वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी आणि मनपा प्रशासन यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. हरित लवादाने वृक्षतोडीवरील स्थगिती १४ ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे. अलीकडेच मनपा वृक्ष प्राधिकरण समितीने ५१७ झाडे तोडण्यास मंजुरी दिली. यासंदर्भात मनिष बाविस्कर, अश्विनी भट, एस. गोळे, अमित सिंग आणि अन्य स्थानिक वृक्षप्रेमींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ॲड. श्रीराम पिंगळे यांनी महापालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना नोटीस बजावली. प्रस्तावित वृक्षतोडीबाबत नागरिकांकडून हरकती मागविण्यासाठी नोटीस दिलेली नव्हती. या संदर्भातील कुठलीही माहिती मनपा किंवा वृक्ष प्राधिकरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नाही. नोटीसीतून या वृक्षतोडीवर आक्षेप घेण्यात आला.

नाशिक महापालिकेचे धोरण पर्यावरणविरोधी आणि भ्रष्टाचाराला वाव देणारे ठरले. मनपाने वृक्ष गणना, वृक्ष परीक्षण केलेले नाही. मागील कुंभमेळ्यात महापालिकेने वृक्ष प्राधिकरण कार्यान्वित केलेले नव्हते. मागील कुंभमेळ्यातील खर्चाचा ताळेबंद तयार केला नाही. अथवा ते सार्वजनिक केले नसल्याची साशंकता ॲड. पिंगळे यांनी व्यक्त केली. वृक्ष तोडीबाबतची कुठलीही माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर नाही. वृक्ष प्राधिकरणच्या बैठका, निर्णय आणि इतिवृत्त सार्वजनिक केले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरणाची स्थापना झाली असल्यास तिची रचना प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. नोटिसीत वृक्ष प्राधिकरणच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला गेला आहे. या संदर्भात आयुक्त खत्री यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपणास अशी नोटीस मिळाली नसल्याचे नमूद केले.

स्थगिती आदेशाला बगल देण्याचा आक्षेप

शहरात झाड तोडण्यास स्थगिती आदेश लागू आहे. हरित लवादाच्या परवानगीशिवाय नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील कोणतीही झाडे तोडण्यास मनाई असल्याने, महापालिकेने झाडांची मुळे अशा प्रकारे मोकळी (उघडी) करून या स्थगिती आदेशाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप नोटिसीत वृक्षप्रेमींनी घेतला आहे. यामुळे हलक्या वाऱ्याच्या दाबानेही ती झाडे पडून जातील. ही कृती वैधानिक तरतुदी आणि न्यायालयाच्या आदेशांच्या भावनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. वृक्ष प्राधिकरणाने ५१७ झाडे तोडण्यासाठी दिलेल्या परवानगीशी संबंधित सर्व संबंधित कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, उघडी केलेली सर्व झाडांची मुळे त्वरित मातीने झाकून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.