नाशिक – यंदाच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी, विराट कोहली, शुभमन गिल, हेन्री क्लासेन या फलंदाजांची नावे जशी लक्षात राहिली, त्याप्रमाणे फलंदाजांना आपल्या जाळ्यात पकडणारे आणि वेगाने हैराण करुन सोडणारे जोफ्रा आर्चर, रबाडा, मोहंमद सिराज, मोहंमद शमी, लुंगी एनगिडी, कमिन्स यांच्यासारखे जलदगती गोलंदाजही लक्षात राहिले.
रणजी करंडक असो, आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामने असोत. जलदगती गोलंदाज आपल्या संघात अधिक असावेत, अशी प्रत्येक कर्णधाराची इच्छा असते. परंतु, जलदगती गोलंदाज एका रात्रीतून जन्माला येत नाहीत. आधी त्यांचा शोध घ्यावा लागतो, नंतर त्यांच्यावर पैलु पाडावे लागतात. आपणही जसप्रित बुमराह, मोहंमद सिराज यांच्यापेक्षा अधिक जलद गोलंदाजी करु शकतो, असे वाटणारे अनेक जण असतात. परंतु, त्यांना योग्य संधी मिळत नाही. अशी संधी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने (एनडीसीए) नवोदित आणि प्रस्थापित गोलंदाजांसाठी उपलब्ध करुन दिली. आणि त्या संधीचा काही जणांनी लाभ उठवत आपण किती वेगाने चेंडू टाकू शकतो, हे दाखवून दिले.
नाशिकच्या मखमलाबाद येथील क्रीडक सेंटर ऑफ क्रिकेट एक्सलन्स येथे ही सर्वात जलद गोलंदाजाचा शोध घेण्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या उदघाटनप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल शहा, सचिव समीर रकटे, विनोद यादव, तरुण गुप्ता, फय्याज गंजीफ्राॅकवाला, के. व्ही. जोशी, गोपी जाधव, विभास वाघ यांसह प्रमुख पाहुणे तथा चाचणीचे निरीक्षक माजी रणजीपटू आणि गोलंदाजी प्रशिक्षक अनुपम संकलेचा हे उपस्थित होते.
फलंदाज होणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी गोलंदाजांनाही तितकेच महत्व असते. जलदगती गोलंदाजांचा वेग पाहून अनेकांना आपणही त्यांच्यासारखे व्हावे, असे वाटते. कित्येकांना तर आपण बुमराहपेक्षा जलद गोंलंदाजी करु शकतो, असेही वाटते. अशा उदयोन्मुख तसेच प्रस्थापित जलदगती गोलंदाजांना त्यांचा वेग आजमावण्याची संधी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने व्यावसायिक पद्धतीने जलदगती गोलंदाजांसाठी गुणवत्ता शोध मोहीम (Fast Bowling Talent Hunt) राबवली. यासाठी खास रडार स्पीड गनच्या सहाय्याने गोलंदाजांच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. मुले, पुरुष गोलंदाजांच्या बरोबरीने मुली, महिला क्रिकेटपटूंना देखील ही संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
या चाचणीत महिलांमध्ये खुल्या गटात धनश्री काकडने ताशी १०५ किलोमीटर वेगाने तर, वैष्णवी फटांगरेने ताशी १०० किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली. या दोघी खुल्या गटात प्रथम आणि द्वितीय आल्या. १६ वर्षांआतील मुलींमध्ये आरोही सानपने ताशी ७७ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करुन प्रथम स्थान मिळविले.
मुलांमध्ये खुल्या गटात रोहन शेंडगेने ताशी १२९ किलोमीटर तर आकाश शेलारने ताशी १२६ किलोमीटर वेग दाखविला. १६ वर्षांआदील मुलांमध्ये विहान हेकरेने ताशी ११७ तर शिवम केवटने ताशी ११३ किलोमीटर वेग दाखविला. खुल्या वर्गातील विजेत्यास रुपये ५०००, उपविजेत्यास ३००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. १६ वर्षांखालील जलदगती गोलंदाजांसाठी हेच बक्षीस अनुक्रमे रुपये ३००० आणि रुपये २००० असे होते.
