नाशिक – भोंदु अशोक खरातच्या गैरकृत्याला बळी पडलेल्यांची संख्या कमी नाही. त्याच्या भविष्य कथनाच्या दंतकथांमुळे नामांकित व्यक्तींनीही त्याच्या दरबारात हजेरी लावली हे नाकारता येत नाही. त्यात पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचाही समावेश आहे. पोलीस तपासात अडथळा, तपासाची दिशा योग्य पध्दतीने पुढे जाते की नाही, याची विचारणा करण्यासाठी त्याच्याकडे पोलीस अधिकारी, कर्मचारी जात होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काही आठवड्यांपासून अशोक खरात सातत्याने चर्चेत आहे. त्याच्या अंधभक्तांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. काही कौटुंबिक कलह दूर व्हावेत, मुला-मुलीचे लग्न, संततीसुख अशा वेगवेगळ्या कारणांनी त्या ठिकाणी जात होते. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यानुसार माणसांपरत्वे त्यांच्या अडचणी बदलत गेल्या. खरातचे काही ठोकताळे खरे ठरल्याने खरातने आपल्या प्रसिध्दीसाठी त्याचा अचूक वापर करुन घेतला. त्यामुळे व्यवसाय वृध्दीसाठी, शत्रुला नामोहरम करण्यासाठी, यासह इतर वेगवेगळ्या कारणांकरिता उच्चभ्रू मंडळीची मांदियाळी त्याच्या कार्यालयात कायम असायची.
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील खरातने आपले साम्राज्य मिरगाव येथे उभे केले. स्थानिकांना काही घटनांमुळे तो भोंदु असल्याचे लक्षात आले. याविषयी एका ग्रामस्थाने एक उदाहरण सांगितले. एका युवकाचा अपघात झाला. डॉक्टरांनी तो चार दिवसच जगू शकेल, असे सांगून घरी नेण्यास सांगितले.
अपघातग्रस्त युवकाचे नातेवाईक खरातला भेटले. खरातने त्या युवकाचे उज्वल भवितव्य आहे. घुबडपूजा करावी लागेल, असे सांगत त्या युवकाच्या नातेवाईकांकडून पैसे लाटले. पूजेच्या नावाखाली त्याच्या उशाखाली ठेवायला पक्ष्याचे पाय दिले. त्या युवकाचा दोन दिवसात मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी युवकाच्या उशाखाली ठेवलेल्या पक्ष्याचे पाय पाहिले असता घुबडाचे सांगून त्यांना कोंबडीचे पाय देण्यात आले होते.
खरातविषयी पसरलेल्या गोडगैरसमजाला पोलीसही भुलले. स्थानिक, जिल्हा तसेच शहर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी कामाचा वाढता ताण, वरिष्ठांचा दबाव, तपास कामात येणारे अडथळे, तपास कुठून सुरू करावा, यासह वेगवेगळ्या कारणांसाठी खरातकडे जात होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगितले.
खरातकडे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी जात होते, गुन्ह्यांच्या तपासाविषयी किंवा अन्य काही कामांविषयी बोलत होते, अशी कुठलीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. या केवळ अफवा आहेत. पोलीस त्यांचे काम योग्य पध्दतीने करत असतात.- बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक जिल्हा)
