नाशिक – गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात गुन्हेगारांना जरब बसेल, समाजात अनुचित प्रकार करणाऱ्यांना धाक वाटेल, असा निकाल नाशिक जिल्हा न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
७ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्गशिक्षक गोरखनाथ जोशी (४३) हा वर्गात गणित विषय शिकवित होता. यावेळी मुख्याध्यापक तुकाराम साबळे (५३) याचा जोशी यास फोन आला. गोरखनाथ जोशीने काहीएक खातरजमा न करता १३ वर्षाच्या मुलीला सांगितले की, तुझी आजी साबळे सरांच्या घरी आली आहे. तुला साबळे सरांनी त्यांचे घरी बोलविले आहे, असे सांगितले. तुकाराम साबळे हा शाळा परिसराच्या बाहेर राहतो, हे गोरखनाथ जोशी याला माहित होते. तरीही त्याने मुलीला एकटीला तुकाराम साबळे याच्या घरी पाठवून दिले. मुलगी तुकाराम साबळेच्या घरी गेल्यावर त्याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
संबंधित मुलीने शाळेत आल्यावर घडलेला प्रकार गोरखनाथ जोशी याला सांगितला. परंतु, त्याने पीडितेवर झालेल्या अत्याचाराची कोणतीही दखल घेतली नाही. याबाबतची तक्रार देण्यासाठी तिला मदत केली नाही. दरम्यान, हे प्रकरण घोटी पोलिसांपर्यंत पोहचल्यावर त्यांनी मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरखनाथ जोशी या दोघांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी निकाल दिला.
न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापक तुकाराम साबळे याला दोषी ठरवून आजन्म कारावास आणि दोन लाख रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद, याशिवाय पोस्को कायद्याच्या कलम १० अन्वये सात वर्षाचा सक्त कारावास आणि २५ हजार रूपये दंड, पोस्को कायद्याच्या कलम आठ अन्वये पाच वर्ष सक्त कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी वर्गशिक्षक गोरखनाथ जोशी याला पोक्सो कायद्याच्या कलम २१ अन्वये दोषी ठरवुन सहा महिने साधा कारावास आणि ६८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साथी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.
आरोपींना शिक्षा झाल्याने संपूर्ण इगतपुरी तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी घोटीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास केला होता. त्यांनी उत्तम तपास केल्याने आरोपींना कठोर शिक्षा झाली. याबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. लिना चव्हाण यांनी काम पाहिले.
