पोलीस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा

महापालिका निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापू लागले असताना नाशिकरोड भागात उमेदवारीसाठी इच्छूक सुरेंद्र शेजवळ या अनेक गुन्हे दाखल असलेल्याची हत्या झाल्यानंतर सतर्क झालेल्या पोलीस आयुक्तांनी रविवारी सर्व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय पक्षांकडे ऊठ-बस असणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले.

निवडणूक जवळ आली असताना शेजवळची झालेली हत्या पोलिसांसाठी सतर्कतेचा संदेश देणारी ठरली आहे. शेजवळच्या हत्येचे कारण पोलिसांकडून पूर्ववैमनस्य हे दिले जात असले तरी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार झाल्याने विविध तर्क लढविले जात आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठकीत घेतला. राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारांचा आढावा घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. मागील सर्व निवडणुकांमध्ये दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन त्यातील संबंधितांवरही कारवाईचे संकेत त्यांनी दिले. तुरूंगातून  सुटलेल्या सर्व गुन्हेगारांविरूध्दही कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.