गुन्हेगारी घटनांनी पिंपळगाव परिसर हादरला

दुहेरी हत्याकांडासह आत्महत्या, चिमुकल्याचा खून

Mumbai's Saki Naka , 24 yr old man allegedly beaten to death over suspicion of mobile theft , Crime , Police, Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दुहेरी हत्याकांडासह आत्महत्या, चिमुकल्याचा खून

पिंपळगाव बसवंतमधील पवननगर भागात झालेले दुहेरी हत्याकांड व आत्महत्या तसेच इस्लामपूर भागात झालेला चिमुकल्याचा खून या अवघ्या चोवीस तासात घडलेल्या दोन घटनांमुळे गावात दहशत व तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, दुहेरी हत्याकांडाची घटना अनैतिक संबंधामुळे घडल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच चिमुकल्याच्या खून प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपळगाव बसवंतच्या पवननगर भागात दोन आठवडय़ापूर्वी रवींद्र नागमल हे कुटुंबीयांसमवेत राहण्यासाठी आले होते. पत्नी सुरेखा व मुलगा अमोल यांच्यासह नातेवाईक विशाल पानपाटील हा त्यांच्या सोबत राहत होता. नागमल कुटुंबीय नुकतेच आल्यामुळे परिसरात त्यांचा फारसा परिचय नव्हता. गावात एका ठिकाणी रवींद्र नागमल नोकरी करत होते तर गावातील शाळेत मुलांचे शिक्षण सुरू झाले होते.

कामापुरते बोलणाऱ्या नागमल कुटुंबियांच्या घराचा दरवाजा सकाळचे दहा वाजले तरी का उघडला नाही हे पाहण्यासाठी शेजाऱ्यांनी डोकावले असता नागमल यांची पत्नी सुरेखा व विशाल यांची हत्या तर रवींद्र नागमल यांनी गळफास घेतल्याचे चित्र पाहुन सारेच हादरले. तर नागमल यांचा मुलगा अमोल सुदैवाने बचावला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी नागमल यांच्या खिशात चिठ्ठी आढळली. चिठ्ठीत पत्नी सुरेखा व मेव्हणा विजय पानपाटील यांच्यात अनैतिक संबंध होते, हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यामुळे रागाच्या भरात पत्नी व पानपाटील यांचा मुलगा विशाल यांचा खून करत आत्महत्या करत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना इस्लामपूर भागात घडली. या भागात राहणारे लूकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहिल शनिवारपासून बेपत्ता होता. त्या बाबत कुटूंबियांनी साहिल बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असतांना रविवारी रात्री त्याचा मृतदेह आढळून आला.

या घटनेचा तपास सुरू असतांना नातेवाईकांना मिळालेल्या माहितीनुसार पिंजारी यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयित भिकन नजेर पिंजारी (३७) याने साहिलचे अपहरण केले. काही महिन्यांपूर्वीच भिकनची पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो त्याच्या आई सोबत राहत होता. विचित्र आणि विक्षीप्त असलेल्या भिकनने साहिलचे अपहरण करत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले, हे प्रकरण उघड होऊ नये यासाठी त्या चिमुरडय़ाचा उशीच्या मदतीने गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार भिकनच्या आई समोर घडला. मात्र मुलाचे गैरकृत्य पाठीशी घालण्यासाठी चिमुकल्याचा मृतदेह घरातच दडवून ठेवत त्यांनी घराला कुलूप लावून देत सर्वासोबत साहिलला शोधण्याचा बनाव केला.

काही शेजारील कुटुंबीयांनी साहिलला शेवटी संशयित भिकन सोबतच पाहिले असल्याचे समजताच जमावाने त्यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यावेळी संशयित भिकनच्या आईने दरवाजाजवळ ठिय्या देत इथे काही नाही, असे सांगत जमावाला शिवीगाळ केली. मात्र संतापलेल्या जमावाने संशयित युवकाला बेदम मारहाण सुरू केली. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी संशयित युवक व त्याच्या आईला ताब्यात घेतले. जमावाने केलेल्या मारहाणीत संशयित भिकन जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nashik crime news