जुन्या वादातून त्रिकूटाने गोळीबार करीत युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी सातपूर औद्योगिक वसाहतीलगतच्या कार्बन नाका भागात घडली. यावेळी संशयिताचे वाहन बंद पडल्याने त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनधारकाला बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवित त्याची दुचाकी घेऊन पलायन केले. या घटनेमुळे कामगार वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : चोरांकडून आठ भ्रमणध्वनी, पाच बॅगा जप्त , इगतपुरी रेल्वे पोलिसांची कामगिरी

कार्बन नाका परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ ही घटना घडली. तपन जाधव हा आपल्या मोटारीतून दुपारी सहकाऱ्यांसोबत निघाला होता. संशयित आशिष जाधव आणि साथीदारांच्या मोटारीने तपनच्या वाहनाला मागून धडक दिली. दोन्ही गटांची वाहने थांबल्यानंतर काही कळण्याच्या आत तीन संशयित मोटारीतून उतरले. त्यांनी तपनवर कोयत्याने वार करीत गोळीबार केला. यावेळी तपनसोबतचा एक सहकारी घाबरून पळून गेल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात तपन गंभीर जखमी झाला. औद्योगिक क्षेत्रालगत ही घटना घडली. दुपारी कारखान्यांमध्ये दुसरे सत्र सुरू होण्याची वेळ होती. कामगार निघाले होते. संशयितांची मोटार धडक बसल्याने बंद पडली होती. आपले वाहन सुरू होत नसल्याने त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका कामगाराला कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवित रोखले. मारण्याची धमकी देऊन त्याची दुचाकी घेऊन संशयित पसार झाले.

हेही वाचा >>> नाशिक : राज ठाकरे यांच्या सभेसाठी सातपूरमधून शंभर वाहनांचे नियोजन

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. संशयितांच्या मोटारीत काही कोयते आढळल्याचे सांगितले जाते. जखमी तपनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, संशयित आशिष आणि जखमी तपन यांच्यात पूर्ववैमनस्य असल्याचे सांगितले जाते. २०१४ आणि २०१५ मध्ये परस्परांच्या भावाच्या खून प्रकरणात यातील काही संशयित आहेत. दोन्ही गटात आधीपासून वाद असल्याची चर्चा आहे. यातून एका गटाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik crime news firing on youth in satpur youth stabbed by koytya zws
First published on: 19-03-2023 at 22:10 IST