नाशिक -पुढील वर्षी होणाऱ्या सिस्स्थ कुंभमेळ्याची तयारी करणाऱ्या नाशिक नगरीत काही महिन्यांपासून दररोज धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यामुळे धार्मिक नगरी असलेल्या नाशिकच्या नावाची अप्रतिष्ठा होत आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे उघड झाल्यापासून या प्रकरांना सुरुवात झाली. खरातनंतर पत्रकार रवींद्र एरंडेचे प्रकरण, त्यानंतर संपूर्ण देशाला हादरविणारे टीसीएस कंपनीतील प्रकरण आणि आता ‘नीट २०२६’ परीक्षा पेपरफूट, या सर्व प्रकरणांशी नाशिकचा संबंध आल्याने २०२६ हे वर्ष नाशिक शहरासाठी वाईट ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. अशा वादग्रस्त आणि वाईट घटना अखेर नाशिकमध्येच सातत्याने का घडत आहेत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
२०२७ मध्ये नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. प्रशासन कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त आहे. कुंभमेळ्यासाठी अवधी कमी राहिल्याने आणि तुलनेत अजून बरीच कामे होणे बाकी असल्याने प्रशासनापुढे रात्र थोडी सोंगे फार अशी स्थिती आहे. सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा आहे. आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकचे नाव देशभरात चर्चेत आले असताना काही महिन्यांपासून नाशिकचे नाव वादग्रस्त प्रकरणांशी जोडले गेले आहे.
मुंबई, नागपूर, पुणे या महाराष्ट्रातील महानगरांच्या तुलनेत लहान असलेल्या नाशिकची कायदा व सुव्यवस्था हा विषय कायमच चर्चेत असतो. नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठल्यावर पोलिसांना जाग येते, असे याआधीही घडले आहे. परंतु, काही महिन्यांपासून नाशिकमध्ये गुन्हे क्षेत्राशीच संबंधित घडलेल्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. सर्वप्रथम सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री ईशान्येश्वर मंदिराची उभारणी करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे प्रकरण बाहेर आले. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण, अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे अशोक खरातवर आरोप आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबरोबर असलेले अशोक खरातचे फोटो समाज माध्यमात आल्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले. त्यानंतर अनेक राजकीय नेते, उद्योजक हेही भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातच्या कसे कच्छपि लागले होते, हे पुढे आले.
सध्या अशोक खरातच्या पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी अशा वाऱ्या सुरु आहेत.अशोक खरातनंतर नाशिकच्या सातपूर भागातील पत्रकार रवींद्र एरंडे यानेही काही महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण बाहेर आले. गरजू महिलांना रोजगाराचे, स्वयंरोजगार उभा करण्यासाठी मदतीचे आश्वासन देत एरंडे त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. आणि त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. एरंडे सध्या कोठडीत आहे.
अशोक खरात, रवींद्र एरंडे यानंतर संपूर्ण देशाला हादरविणारे नाशिकच्या टीसीएस कंपनीतील प्रकरण बाहेर आले. महिला कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ, धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकणे, असे प्रकार टीसीएसच्या नाशिक येथील छोट्या केंद्रात घडत असल्याचे उघड झाले. टीसीएस प्रकरणाची थेट राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान ही ४० दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर छत्रपती संभाजीनगरातून तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या निदा खान न्यायालयीन कोठडीत आहे.
टीसीएस प्रकरण गाजत असतानाच आता नीट २०२६ परीक्षेच्या पेपरफूट प्रकरणाशी नाशिकचे नाव जोडले गेले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ मे रोजी देशभरात वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट २०२६ ही परीक्षा घेतली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त होत असून यासंदर्भात नाशिक येथील शुभम खैरनार या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अशाप्रकारे नाशिकचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने काही महिन्यांपासून सातत्याने प्रकाशझोतात राहिले आहे. तरीही नाशिककरांना एक प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. तो म्हणजे, “वारंवार नाशिकच का ? “
