नाशिक – नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा डंका शहर पोलिसांकडून पिटला जात असला तरी या बालेकिल्ल्यास छेद देण्याचे प्रकार महापालिका निवडणुकीनंतर होऊ लागले आहेत.
अंबड परिसरात मंगळवारी रात्री १५ ते २० जणांच्या टोळक्याने हातात तलवार, कोयता घेत धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखा क्रमांक एक आणि दोन तसेच अंबड पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या केलेल्या कामगिरीत परदेशी टोळीच्या १० संशयितांना जेरबंद करण्यात आले.
मंगळवारी रात्री सिडकोतील त्रिमूर्ती चौकात अवनी रेसिडेन्सी या ठिकाणी रात्री नऊ वाजता एक चारचाकी आली. त्या गाडीमध्ये १० ते १२ जण झोपून इशाऱ्याची वाट पाहत होते. या टोळक्याला कुणालातरी लक्ष्य करायचे होते. परंतु, संबंधित व्यक्ती न भेटल्याने त्यांनी परिसरातील गाड्यांवर कोयत्याने वार करीत परिसरात हैदोस घातला.
यावेळी परिसरातील नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले. एक महिला घरात पळाली. त्या घरात जेवण करायला बसलेले कुटुंबीय देखील घाबरले. त्याच दरम्यान गरम भाजीच्या पातेल्याला पाय लागल्यामुळे ते पातेले एका दोन वर्षीय मुलीच्या अंगावर पडल्याने ती चिमुकली भाजली गेली. यानंतर सदरहू टोळके या ठिकाणाहून निघून कामटवाडेकडे गेले. सिडकोतील कमल नगर, सावन रो हाऊस परिसरात रात्री ९-.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्राने दोन ते तीन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. अंबड पोलिसांनी दोनही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला.
दरम्यान, या प्रकरणात चोवीस तासाच्या आत गुन्हे शाखा क्रमांक एक, दोन आणि अंबड पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या केलेल्या कामगिरीत कुंदन परदेशी टोळीतील १० संशयितांना नाशिक ग्रामीण, धुळे जिल्ह्यातील मध्य प्रदेशचा सीमा भाग आणि म्हसरूळ परिसर या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
पोलिसांनी कुंदन परदेशी (२३, रा. ओझर शिवार), आदित्य पिंगळे (२३, रा. मखमलाबाद), कुणाल एखंडे (२५, रा. मखमलाबाद), राहुल गवारे (२१, रा. पेठरोड), शुभम पवार (१९, रा. म्हसरूळ), रोहित जाधव (२६, रा. पेठरोड), कमलेश सुराणा (२७, रा. शांती नगर), मानसी वाळके (३३, रा. श्रीराम नगर), वेदांत परदेशी (१९, रा. पवन नगर) आणि विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे.

