नाशिक – आपल्याशी नडल्यास त्याची हाडे गंगेत मिळतील, अशी धमकी देणाऱ्या दोन महिलांची चित्रफित समाज माध्यमात आली होती. पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी कारवाई सुरू असतांना महिलांनी अशा प्रकारे चित्रफित तयार करत थेट आव्हान दिले.
शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या ७०० हून अधिक तक्रारी असतांना दुसरीकडे, महिलांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये असणारा सहभागही चिंताजनक ठरत आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात महिलांचा सहभाग असणारे २० गुन्हे दाखल असून २३ महिलांना अटक करण्यात आली आहे.
शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असतांना महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. महिला आणि बालकांविषयी गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून हुंडाबळी, लैंगिक शोषण, अपहरण असे गुन्हे होत आहेत. अशा स्वरूपातील काही गुन्ह्यांमध्ये महिलांचा गुन्हेगारी विश्वात असणारा सहभाग उघड होत आहे. नाशिक शहर परिसराचा विचार केल्यास पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महिला आणि बालकांसाठी स्वतंत्र विभाग करत त्या संदर्भातील तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात येत आहे.
अलीकडील काळात शहर परिसरात गुन्हेगारी वाढलेली असतांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात आक्रमक पवित्रा घेत गुंडांच्या तोंडून नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांची धिंड काढण्यात येत आहे. राजकिय पक्षाशी संबंधित काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, भाजपचे अजय बागूल, मामा राजवाडे यांचा समावेश आहे.
खंडणी, खून, हाणामारी प्रकरणी धरपकड सुरू असतांना यामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवर हल्ला , लैंगिक छळ, महिलांचा छळ, अपहरण, हुंडाबळी, हत्या यांच्याशी संबंधित विविध कलमांतंर्गत जानेवारीपासून आतापर्यंत ७०० हून अधिक तक्रारी आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २५४ प्रकरणे अपहरणाचे, पाच हुंडाबळीचे, दोन हत्या, महिला अत्याचाराचे १६१, पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून हुंड्यासाठी छळाची १४४ प्रकरणे असून हुंडाबळीच्या पाच घटना शहरात घडल्या आहेत.
बलात्काराच्या ४३ घटना घडल्या आहेत. याशिवाय काही पोस्को कायद्यातंर्गतच्या तक्रारी आहेत. महिला तक्रारींची संख्या वाढत असतांना गुन्हेगारी कारवायांमध्ये महिलांचा असणारा सहभागही आश्चर्यकारक आहे. रिल्स तयार करत समाज माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याने दोन महिलांवर दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
याशिवाय चोरी, सोनसाखळी चोरी, खंडणी, मारामारी यासह काही गंभीर गुन्ह्यात शहर परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २० गुन्हे दाखल असून २३ महिला संशयितांना अटक करण्यात आली आहे.
