मालेगाव : देशभरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चार सायकलपटूंनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा संदेश घेऊन या सायकलपटूंनी श्रीनगर (काश्मीर) ते कन्याकुमारी हा सुमारे ३८०० किलोमीटरचा खडतर प्रवास अवघ्या ११ दिवस, १० तास आणि ५ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
या मोहिमेची सुरुवात श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातून झाली. अत्यंत कमी कालावधीत भारताचे उत्तर ते दक्षिण टोक जोडण्याच्या जिद्दीने निघालेले हे चारही सायकलपटू ११ दिवसांत कन्याकुमारीच्या ‘झिरो पॉईंट’ येथे पोहोचले. एका विक्रमी वेळेत ही मोहीम फत्ते करून त्यांनी नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हे चारही सायकलपटू विविध क्षेत्रातील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले कर्मचारी आहेत. सेवानिवृत्तीनंतरही तरुणांना लाजवेल,असा उत्साह या सायकलपटूंनी मोहिमे दरम्यान दाखवला आहे. त्यांच्यातील शिस्त आणि जिद्द वाखणण्याजोगी अशीच असल्याचे सिद्ध झाले आहे. या मोहिमेत सहभागी झालेले प्रवीण कोकाटे हे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक,दिनकर पाटील हे माजी सैनिक, संजय राऊत हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक व श्रीकृष्ण आवारे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यापैकी संजय राऊत हे मूळचे मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील रहिवाशी आहेत.
या प्रवासादरम्यान या सायकलपटूंनी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा १० राज्यांमधून प्रवास केला. काश्मीरच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीपासून ते दक्षिण भारताच्या उष्ण वातावरणापर्यंतचा सर्व निसर्ग त्यांनी या सायकल मोहिमेत अनुभवला. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान जागोजागी नागरिकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी आरोग्य, फिटनेस आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रभक्ती, त्याग आणि अनुशासन या त्रिसूत्रीच्या आधारावर ही मोहीम यशस्वी झाली. स्वप्न बघा आणि धाडसाने त्याचा पाठलाग करा, हा संदेश या मोहिमेद्वारे या सायकलपटूंनी देण्याचा प्रयत्न केला. या ऐतिहासिक यशाबद्दल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक होत असून,’हम फिट तो इंडिया फिट’ ही मोहीम आता लोकचळवळ बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
