नाशिक – नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे. ओझर (नाशिक) विमानतळावरून नवी दिल्लीसाठी सकाळची थेट विमानसेवा १ ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा सुरू झाली आहे.ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना निवेदन देऊन तातडीने विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार भगरे यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रश्नात विशेष सहकार्य केल्याचे म्हटले आहे.

खासदार भगरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना दिलेल्या निवेदनात नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दिल्लीसाठी पूर्वी नियमित सकाळची विमानसेवा उपलब्ध होती. दिल्लीहून नाशिकसाठी सकाळी ६.२० वाजता, तर नाशिकहून दिल्लीसाठी सकाळी ८.४० वाजता विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी तसेच शासकीय कामासाठी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळत होती.

मात्र, ही विमानसेवा २८ मार्च २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. नाशिक जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे खासदार भगरे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नाशिक-दिल्ली विमानसेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.

सकाळची थेट नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे नाशिक जिल्ह्याची राजधानी दिल्लीशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः द्राक्ष, कांदा व इतर कृषी उत्पादनांच्या व्यापारासह उद्योग, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि शासकीय कामकाजासाठी दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

१ ऑक्टोबरपासून सुधारित वेळापत्रक

विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, इंडिगोचे ६ ई २३१२ हे विमान दररोज सकाळी ९.०० वाजता ओझर (नाशिक) येथून नवी दिल्लीसाठी रवाना होऊन सकाळी १०.५० वाजता दिल्ली येथे पोहोचणार आहे. तसेच ६ ई ६३११ हे विमान दिल्लीहून सकाळी ६.४० वाजता रवाना होऊन सकाळी ८.३० वाजता नाशिक विमानतळावर पोहोचणार आहे. हे सुधारित वेळापत्रक १ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहे.