नाशिक – मागील काही दिवसांपासून पावसाने अंशतः उघडीप घेतली असली तरी ऐन श्रावणात सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये भर घालणारा आहे. रिमझिम पावसामुळे हवेत काही अंशी गारवा असताना अनेकांना डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप यासह उलट्या, जुलाब असा त्रास होत असतानाच डेंग्यूचा विळखा पडत आहे. मागील महिनाभरात डेंग्यूचे १०१ रुग्ण आढळले.

नाशिक शहर परिसरात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला. शहर परिसरात पूरसदृश परिस्थिती होती. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर ओसरला आणि ऊन पडण्यास सुरुवात झाली. मात्र, या काळात ठिकठिकाणी पावसाचे साचलेले डबके, घराच्या आवारात साचलेल्या सामानामध्ये जमा झालेले पाणी यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. याशिवाय सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाला. अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली. दूषित पाण्यासह बदलत्या वातावरणाचा नागरिकांना त्रास होत आहे.

नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर या ठिकाणी जानेवारी ते ऑगस्टअखेरपर्यंत मलेरियाचे १२ रुग्ण आढळले. चिकनगुनियाचे नऊ रुग्ण, तर डेंग्यूचे १०१ रुग्ण आढळले आहेत.

सर्वेक्षण, दंडात्मक कारवाई

रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. याशिवाय धुरळणी वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. घराभोवती, तसेच अन्य भागात पाणी साचलेल्या ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय गृहभेटी, कंटेनर सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी, डेंग्यूसदृश रुग्णांचा शोध घेत उपाययोजना करण्यात येत आहेत. जनजागृती करण्यात येत असून, मोठ्या पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. डेंग्यूसदृश रुग्णांच्या घरी व परिसरात धूरफवारणी, मायकिंग करून आजाराविषयी माहिती दिली जात आहे. खासगी दवाखान्यांतील रुग्णांची माहिती गोळा करून रुग्ण आढळून आलेल्या भागात तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. एडिस डासाच्या अळ्या आढळून आलेल्या ठिकाणी नोटिसा देण्यात येत असल्याची माहिती मलेरिया विभागाचे डॉ. रवींद्र ढोले यांनी दिली.

आरोग्य विभागाचे दक्षतेचे आवाहन

नागरिकांनी आठवड्यातून एकदा सर्व पाण्याची भांडी रिकामी करावीत. पाण्याची भांडी झाकून ठेवावीत. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. ताप आल्यास डॉक्टरांकडे जाऊन औषधे घ्यावीत. दिवसा डास चावत असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मलम, पूर्ण कपडे वापरावेत. सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.