नाशिक – वेगवेगळ्या मालाची तस्करी करणारे अशा युक्त्या काढतात की, ‘पुष्पा’ चित्रपटातील आयडिया यांच्यापुढे काहीच नाही असे वाटावे. तस्करीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चलाखीने वापर करण्यात येऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यात असाच गुटखा तस्करीचा ‘हायटेक फंडा’ चर्चेत आहे. तस्करांची ही अचाट बुध्दी पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेरवस्तीजवळ ८ जुलैच्या रात्री एक मोटार संशयास्पदरित्या फिरत असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. ग्रामस्थांनी मोटार अडवून चौकशी केली. परंतु, मोटारीतील व्यक्तींकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत मोटार  देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली.

पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता मोटारीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा ( गुटखा ) आढळून आला. याबाबत देवळा पोलिसांनी नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन सुरक्षा पथकाला  तातडीने माहिती दिली. त्यानंतर देवळा येथे  केलेल्या कारवाईत १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.

नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनातून ५७ बिग पॅक केसरयुक्त विमल पानमसाला, ७३६ व्ही-१ बिग तंबाखू पाकिटे, एक हजार ९८० किंग पॅक केसरयुक्त विमल पानमसाला, ४४० व्ही-१ किंग पॅक तंबाखू पाकिटे, २२० केसरयुक्त विमल पानमसाला पाकिटे आणि २२० व्ही-१ तंबाखू पाकिटे असा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या मालाची किंमत ४ लाख ९२ हजार २०० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १० लाख रुपये किमतीची मोटार जप्त करण्यात आली आहे .

अशा प्रकारे एकूण १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार (रा.भऊर, ता.देवळा) याला ताब्यात घेण्यात आले असून ,सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने (रा.खर्डे, ता. देवळा) हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनय देवरे, हवालदार नितीन बाराहाते, राहुल शिरसाठ, दिलीप सोनवणे, श्रावण शिंदे  पुढील तपास करीत आहेत.

अशी करण्यात येत होती तस्करी

या कारवाईत गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान चर्चेचा विषय ठरले. मोटारीच्या पुढील आणि मागील दोन्ही नंबर प्लेटसमोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसविण्यात आला होता. रिमोटचे बटण दाबताच काही क्षणांत नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात असल्याने वाहनाचा क्रमांक दिसत नव्हता. त्यामुळे पोलीस, परिवहन विभाग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशाभूल करून प्रतिबंधित मालाची वाहतूक केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.