नाशिक – नाशिक जिल्ह्यातील देवळा मर्चंट बँकेत बनावट, तथा दुय्यम दर्जा असलेले तारण ठेवून बँकेची तब्बल ५४ लाख ७४ हजार रुपयांना फसवणूक करणाऱ्या पाच संशयितांना देवळा पोलिसांनी अटक करुन कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांनी दिली.

देवळा येथील देमको बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव यांनी ५ जुलै २०२४ रोजी देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात फिर्याद दाखल केली होती. त्यात बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र सोनवणे (५०,रा. कापशी ता.देवळा) यांनी सोने तारण कर्जप्रकरण मंजूर करताना बँक खातेदारांचे सोने, चांदी तारण ठेवतेवेळी सोन्याचांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक होते. परंतु, राजेंद्र सोनवणे यांनी काही खातेदारांशी संगनमत करून बँकेचा विश्वासघात केला. सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत या बँकेच्या तब्बल २७ खातेदारांशी संगनमत करून कर्जप्रकरण करताना या खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष, त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवून घेतले. आणि हे सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला.

या अहवालावरून बँकेने नमूद २७ संशयित खातेदारांना ५४ लाख ७४ हजार रुपये कर्ज मंजूर केले. या २७ जणांत कापशी येथील सहा, गुंजाळनगर सहा, देवळा पाच, सुभाषनगर आणि रामेश्वर प्रत्येकी दोन तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव, सरस्वतीवाडी, वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदारांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेचे एकूण ५४ लाख ७४ हजार रुपयांपेक्षा अधिक येणे व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा देवळा पोलिसांनी कसून तपास करत नारायण पवार (रा. गुंजाळनगर), मुकेश निकम (रा. वाखारवाडी), युवराज मेधने (रा.सरस्वतीवाडी), बापू खैरे (रा. सुभाषनगर), सुरेश पगार (रा.रामेश्वर) या पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देवळा पोलिसांच्या या तपास कामगिरीबद्दल देमको बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद, खातेदार यांनी समाधान व्यक्त केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदा पाटील करत आहेत.

दरम्यान, २७ संशयित सोनेतारण खातेदारांपैकी काही बनावट सोने तारण कर्जदार खातेदारांची चौकशी केली असता सहा सोने तारण कर्जदारांनी आपल्या कर्जाच्या रकमेचा बँकेत भरणा केल्याने त्यांच्यावरील अटकेची कारवाई तुर्तास टळली असून उर्वरित संशयित खातेदारांनी आपल्या सोने तारण कर्जाचा भरणा करून आपल्यावरील पुढील अटकेची कारवाई टाळावी, असे आवाहन देमको बँक प्रशासनाने केले आहे,