नाशिक – कळवण तालुक्यातील श्री मार्कंडेश्वर डोंगरावर सोमवती अमावस्यानिमित्त भरणाऱ्या यात्रेस सुरक्षिततेच्या दृष्टीने जाण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली असतानाही नियम मोडत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
कळवण तालुक्यात सप्तश्रृंग गडाजवळ श्री मार्कंडेश्वर डोंगर आहे. या डोंगरावर श्री मार्कंडेश्वर ऋषींचे मंदिर असून दर्शनासाठी आणि यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. गेल्यावर्षी अमावास्येच्या दिवशी मार्कंडेय डोंगरावर जाताना पाय घसरुन काही भाविक जखमी झाले होते. त्यामुळे मार्कंडेश्वर डोंगरावर दर्शनाला जाण्यासाठी व यात्रा भरविण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी बंदी घातली. तरी देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
हेही वाचा – अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
सोमवती अमावस्यानिमित्त मार्कंडेश्वर ऋषी डोंगरावरील मंदिरात दर्शनासाठी नाशिक जिल्हा तसेच बाहेरील राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मागील वर्षी ९० हजार ते एक लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. वणी भागातील अवघड वाटेने काही भाविक जात असताना पाय घसरुन दरीत पडून जखमी झाले होते. मुळाणे बारीतही पाय घसरुन काही भाविक जखमी झाले होते. मार्कंडऋषी डोंगरावर जाताना सपाटी भागाजवळ अरुंद लोखंडी जिना आहे. हा जिना जीर्ण झाला आहे. सध्या पावसाची संततधार चालू असल्याने दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंगरावर जाणे-उतरणे जिवितास धोकादायक असून गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने सोमवती अमावास्यानिमित्त होणाऱ्या यात्रेस जाण्यासाठी बंदी घातली, तरीदेखील भाविकांनी गर्दी केली. डोंगर माथ्यावर पोहोचण्यासाठी भाविकांकडून वेगवेगळ्या पर्यायी मार्गांचा अवलंब केला जात आहे.