नाशिक – नाशिकची ओळख धार्मिक नगरी अशी असल्याने देशभरातून पर्यटक, भाविक नाशकमध्ये येत असतात. भाविकांच्या निवासासाठी शहरात अनेक लाॅज, रिसाॅर्ट असले तरी सर्वसामान्य भाविक धर्मशाळांमध्ये राहण्यासाठी पसंती देतात. नाशिकच्या गोदाघाट परिसरात विविध संस्थांच्या अनेक धर्मशाळा आहेत. बहुसंख्य धर्मशाळा गोदा किनारीच असल्याने भाविकांना मंदिरांना भेट देण्यासाठी धर्मशाळांमध्ये राहणे सोयिस्कर ठरते. या धर्मशाळांपैकी एका धर्मशाळेची चर्चा थेट पंजाबमध्ये होत आहे. त्यास कारणही तसेच आहे.

२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या दोन्ही शहरांमध्ये धार्मिक बाबींकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे, कुंभमेळ्यात देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने त्यांच्या निवासाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध व्यवस्था करण्यात येत आहेत.  कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून धर्मशाळांना अधिक महत्व येणार आहे. नाशिक शहरातील गोदाकिनारी असलेल्या दिल्ली दरवाजा भागातील बालाजी कोटजवळ कपूरथळा नावाची एक धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा कित्येक वर्षांपासून आहे.

गोदाकाठी असलेल्या जुन्या धर्मशाळांपैकी कपुरथळा ही एक आहे. परंतु, सध्या या कपूरथळा धर्मशाळेची अवस्था जीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, ही धर्मशाळा पंजाब सरकारच्या मालकीची आहे. कधीकाळी वैभवात असलेल्या कपूरथळा धर्मशाळेची ही अवस्था पाहून आम आदमी पक्षाने या प्रकरणी लक्ष देण्याचे ठरविले. त्यानुसार नाशिकमधील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी स्वप्निल घिया यांनी पंजाब सरकारच्या मालकीच्या कपूरथळा धर्मशाळेची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांनी कपूरथळा धर्मशाळेचे महत्व आणि तिची गरज या गोष्टी केजरीवाल यांना पटवून दिल्या.

कपूरथळा धर्मशाळेच्या पुनर्बांधणीकडे आपल्याकडून वैयक्तीक  लक्ष दिले जावे, अशी मागणी करणारे निवेदन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना स्वप्निल घिया यांनी प्रत्यक्ष भेटीत दिले. याप्रसंगी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी सिंग यादेखील उपस्थित होत्या. कपूरथळा धर्मशाळेत पंजाब सरकारद्वारे यात्री लंगर सभागृह, भाविक विश्रामगृह आणि आंतरराष्ट्रीय मीडिया माहिती केंद्र उभारण्याची मागणी स्वप्निल घिया यांनी निवेदनात केली आहे. याशिवाय एक नाशिककर या नात्याने आगामी कुंभमेळ्यात नाशिक भेटीचे आमंत्रण अरविंद केजरीवाल यांना दिले. घिया यांनी केलेल्या मागणीबाबत आपण सकारात्मक असून आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या पंजाब सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी बोलून सदर प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. याकामी आपण देखील सदर बाबीचा पाठपुरावा करत मदत करणार असल्याचे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी सिंग यांनी सांगितले.

नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीकोनातून कपुरथळा धर्मशाळेची पुनर्बांधणी महत्त्वाची असून याद्वारे अन्नदान आणि भाविक विश्रांतीचे पुण्य पंजाब सरकारला मिळणार असल्याने त्यांनी यादृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वप्निल घिया यांनी केली आहे. कुंभमेळ्यातील अमृतस्नान पर्वणीसाठी देश, विदेशातून येणाऱ्या पत्रकारांसाठी मीडिया माहिती केंद्र कपूरथळा धर्मशाळेत सुरू केल्यास नाशिकची ख्याती जगभर पोहोचण्यास मदत होईल, असेही आपण केजरीवाल यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे घिया यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या प्रचारार्थ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नाशिकमध्ये येणार होते. सिडकोतील पवननगर मैदानात त्यांची प्रचारसभाही निश्चित झाली होती. परंतु, अचानक आम आदमी पक्षाला मैदानासाठी दिलेली परवानगी  नाकारण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नाशिक दौरा रद्द झाला होता. तो दौरा रद्द झाला नसता तर कदाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कपूरथळा धर्मशाळेची पाहणी केली असती.