नाशिक – दिंडोरी तालुक्यात नाशिक-पेठ रस्त्यावरील चाचडगाव टोल नाक्याजवळ बुधवारी दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले. मृतांपैकी तीन जण गुजरातचे रहिवासी आहेत.

दिंडोरी पुढे नाशिक- पेठ रस्त्यावर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. चाचडगाव टोल नाक्याजवळ नाशिककडून पेठकडे जाणारी मोटार आणि पेठकडून नाशिककडे येणारी मोटार यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात एका मोटारीतील एक प्रवासी तसेच दुसऱ्या मोटारीतील चालक आणि दोन प्रवासी अशा चार जणांचा जागेवर मृत्यू झाला.

किसनलाल गुर्जर (४५), पूनम गुर्जर (४०), छोगालाल गुर्जर ( ६४) आणि शाहरुख खान खराकत खान अशी त्यांची नावे आहेत. एकूण आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.