नाशिक – उपसरपंचांविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत १५ हजार रुपये स्वीकारताना रासेगाव व देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिंडोरी तालुक्यातील ही ग्रामपंचायत आहे.
रासेगाव व देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे (३५) आणि त्यांचे पती विठ्ठल पांडुरंग बेंडकुळे अशी संशयितांची नावे असल्याची माहिती लायलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. तक्रारदार हा याच ग्रामपंचायतीत उपसरपंच आहे. त्यांच्याविरुद्ध काही सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी रासेगाव व देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा बेंंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी स्वतासह ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांसाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
तक्रारदाराकडून लाचेच्या रकमेपैकी १४ हजार रुपये स्वीकारताना सरपंच मंदा बेंडकुळे यांना तर एक हजार रुपये स्वीकारताना त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना पथकाने रंगेहात पकडले.दिंडोरी तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचास पतीसह लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातील ही ग्रामपंचायत आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री झिरवळ यांच्या मुंबईतील मंत्रालयातील कार्यालयात कर्मचाऱ्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यावरून विरोधकांनी मंत्री झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. या प्रकरणानंतर झिरवळ यांच्या मतदारसंघातील महिला सरपंचाचे लाचखोरीचे प्रकरण समोर आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी जबाबदारी सांभाळली. सापळा पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी व पोलीस काँस्टेबल अनिल गांगोडे यांचा समावेश होता.
दरम्यान, शासकीय कार्यालयात अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्यावतीे कोणी खासगी व्यक्ती लाच मागत असल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकासह ०२५३-२५७५६२८, २५७८२३० तसेच व्हॉट्स ॲपवर ९९३०९०७७००, ९५४५०३१०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

