मालेगाव : नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळाप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे सात महिन्यांपासून तुरुंगात आहेत. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेला त्यांचा जामीन अर्ज गुरुवारी एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरीत झाल्याने ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. त्यामुळे हिरे यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी काही काळासाठी वाढला आहे.

हिरे कुटुंबियांशी संबंधित येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी १० वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एकूण सात कोटी ४६ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. तीन टप्प्यात घेतलेल्या या कर्ज प्रकरणांमध्ये केवळ दीड कोटीची एकच मालमत्ता तीन वेळा तारण देण्यात आल्याचा आरोप आहे. शिवाय कर्ज थकबाकीची रक्कम जवळपास ३१ कोटींवर गेली तरी कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने या कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार बँकेतर्फे देण्यात आल्यानंतर येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या मार्च महिन्यात दाखल या गुन्ह्यात अन्य सर्व संशयितांना स्थानिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र कर्ज वितरणाच्या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयात जाऊनही अटकपूर्व जामीन मिळू शकला नव्हता. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी हिरे यांना अटक केली. तेव्हापासून ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

हेही वाचा : जामनेर पोलीस ठाण्यावर जमावाची दगडफेक, जाळपोळ; बालिका हत्या प्रकरणातील संशयितास ताब्यात देण्याची जमावाची मागणी

अटकेनंतर स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यावर हिरे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेण्यात आली होती. दरम्यान,पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर हिरेंनी उच्च न्यायालयात प्रलंबित असलेला अर्ज मागे घेत पुन्हा स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र हाही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर जामिनासाठी त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयात तीन, चार वेळा ‘तारीख पे तारीख’ होत गेल्याने याआधी जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नव्हती.

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा विस्कळीत; हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

गुरुवारी न्या. अनिल किलोर यांच्या न्यायालयात या अर्जावरील सुनावणी ठेवण्यात आली होती. यापूर्वी हिरेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ज्या न्यायालयात सुनावणी झाली होती, त्याच न्यायालयात नियमित जामिनासाठीचा हा अर्ज हस्तांतरित करावा, असा युक्तिवाद बँकेच्या वकिलांनी याप्रसंगी केला. हा युक्तिवाद मान्य करत न्यायमूर्तींनी अर्ज हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे न्या. माधव जामदार यांच्या न्यायालयात आता या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. अर्ज हस्तांतरण प्रकिया पार पडल्यावर न्यायालयातर्फे सुनावणीची नव्याने तारीख देण्यात येणार असल्याने हिरे यांना आणखी काही दिवस तुरुंगात काढावे लागतील, हे आता स्पष्ट झाले आहे.