• विभागाचा केवळ ८३.९९ टक्के निकाल
  • गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घसरगुंडी

यंदाच्या बारावी परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ८३.९९ टक्क्यांपर्यंत घसरला असून राज्यात सर्वात कमी निकालाची नोंद झाली आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. निकालात विज्ञान शाखा सर्वाधिक म्हणजे ९४.४८, वाणिज्य ८८.३५, व्होकेशनल ७६.६३ तर कला शाखेची सर्वात कमी ७३.८० अशी टक्केवारी राहिली. गतवर्षीच्या तुलनेत नाशिक विभागाचा निकाल पाच टक्क्यांनी घसरला आहे.

नाशिक विभागाच्या निकालावर नजर टाकल्यास मुलींचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. यंदा विभागात एक लाख ४८ हजार ४७५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी एक लाख २४ हजार ७०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नियमित परीक्षार्थीमध्ये ७७.९९ टक्के मुले उत्तीर्ण झाली तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.२६ टक्के आहे. नियमित परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नाशिक जिल्हा मागे गेला आहे. या जिल्ह्य़ाची टक्केवारी ८२.९० टक्के एवढी आहे. या यादीत धुळे (८८.५७) पहिल्या स्थानी आहे. पाठोपाठ जळगाव (८३.४६) तर आदिवासीबहुल नंदुरबार (८३.३७) आहे. नाशिक जिल्ह्य़ात ५३ हजार ९३४, धुळे जिल्ह्य़ात २०२७५, जळगावमध्ये ३७ हजार ७२६, नंदूरबार १२ हजार ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी ८८.७१ टक्के निकाल होता. यंदा त्यात वाढ होण्याऐवजी तो पावणे पाच टक्क्यांनी कमी झाला.

राज्यात सर्वात कमी निकालाची नोंद नाशिक विभागात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी सकाळपासून संगणकासमोर ठाण मांडले होते. गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप ३ जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना करण्यात येईल. दरम्यान, यंदापासून ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल.

गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह २६ मे ते ४ जून २०१६ या कालावधीत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे मंडळाने म्हटले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये होणारी पुनर्परीक्षा आता जुलैमध्येच घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील.

उत्तीर्णतेत द्वितीय श्रेणी अव्वल

यंदाच्या निकालात नाशिक विभागात विशेष प्रावीण्यासह ५४३९ विद्यार्थी तर ६० टक्के व त्याहून अधिक गुण ५४ हजार २१० विद्यार्थ्यांनी मिळविले. ४५ टक्के व त्यापुढे अर्थात द्वितीय श्रेणीत ६१ हजार १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण श्रेणीत म्हणजे ३५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३८६८ आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी

नाशिक जिल्ह्यात सर्व शाखांचे मिळून एकूण ६५ हजार ५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात ५३ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धुळे जिल्ह्यात बारावीची परीक्षा देणाऱ्या २२ हजार ८९१ पैकी २० हजार २७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्यात परीक्षा देणाऱ्या ४५ हजार २०५ पैकी ३७ हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नंदुरबार जिल्ह्यात १५ हजार ३२० पैकी १२ हजार ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कॉपीप्रकरणी १३२ विद्यार्थ्यांना शिक्षा

उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत एकूण १३२ उमेदवारांना गैरमार्गप्रकरणी शिक्षा करण्यात आली. त्यामध्ये नाशिकचे ५३, धुळे २२, जळगाव ५१ तर नंदुरबारच्या ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकालात पिछाडीवर असणाऱ्या नाशिकने गैरमार्गाच्या प्रकरणांत आघाडी घेतली.