नाशिक – जिल्हा शासकिय रुग्णालयाचे वादग्रस्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांची प्रशासकिय कारणास्तव बदली पालघर येथे रिक्त पदावर झाली. त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा शासकिय रुग्णालय सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले आहे. येथील कर्मचाऱ्यांवर हल्ले, काही वेळा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा, कर्मचाऱ्यांची आंदोलने अशा वेगवेगळ्या कारणांसह औषध खरेदी गोंधळ, रुग्णांना मिळणारी वागणूक यासह मागील काही महिन्यांपासून करोना काळात झालेल्या घोटाळ्यामुळे चर्चेत आहे.

करोना काळात तत्कालीन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या नंतर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांची नेमणुक झाली. मात्र या काळात ऑपरेशन थिएटर आणि रुग्णालय उभारणी मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला. या मध्ये करोना काळात खरेदी केलेली साधनसाम्रगी यासह अन्य पैशांमध्ये घोटाळा झाला. या सर्व प्रकारावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील सैंदाणे यांच्यासह अन्य दोन जणांवर गुन्हे दाखल झाले. या सर्व प्रकरणात डॉ. थोरात यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. चारूदत्त शिंदे यांची नेमणुक केली.

डॉ. शिंदे या संपुर्ण प्रकरणाचा सखोल तसेच वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करणे आवश्यक होते. मात्र त्यांच्याकडून या बाबत योग्य ती कारवाई झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून एक समिती नाशिक मध्ये दाखल झाली. समितीने केेल्या चौकशी अहवालानुसार डॉ. शिंदे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या मध्ये समितीच्या अहवालानुसार डॉ. शिंदे यांच्या बदलीचे सुचवण्यात आले. त्यानुसार त्यांची बदली झाली.

दरम्यान, डॉ. शिंदे यांची प्रशासकिय आदेशानुसार पालघर येथील वाणगाव येथे रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना तातडीने पालघर येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. डॉ. शिंदे यांच्या रिक्त जागेवर डॉ. निलेश पाटील काम पाहणार आहे. डॉ. शिंदे यांच्या बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयाचे प्रथम, द्वितीय तसेच अन्य वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांनी आरोग्य उपसंचालक यांची भेट घेतली. ही भेट रद्द करावी असे सुचवण्यात आले.