धरणांतील जलसाठा १३ टक्क्यांनी कमी

जिल्ह्यातील लहान-मोठय़ा धरणांमध्ये ६६ टक्के पाणी; गेल्यावर्षी हे प्रमाण ७९ टक्के

जिल्ह्यातील लहान-मोठय़ा धरणांमध्ये ६६ टक्के पाणी; गेल्यावर्षी हे प्रमाण ७९ टक्के

नाशिक : राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण होत असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र वेगळी स्थिती आहे. तीन महिन्यात जिल्ह्यात १० हजार ५११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच हजार मिलीमीटरने पाऊस कमी आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जलसाठय़ावर झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये ६६ टक्के साठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७९ टक्के इतके होते. म्हणजे धरणांतील जलसाठा १३ टक्क्यांनी कमी आहे.

२४ तासात जिल्ह्यात २८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदा अनेक तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाचे अस्तित्व अपवादाने दिसले. इगतपुरी २३९८, पेठ १४३१, त्र्यंबकेश्वर १३२१, सुरगाणा १५१२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगावमध्ये बरी स्थिती आहे. उर्वरित नाशिक २८९, दिंडोरी ३६१, चांदवड १९१, कळवण ३७२, बागलाण ३५१, सिन्नर २४७, येवला ३३८, निफाड ३७१ मिलीमीटर पावसाची नोंद

झाली आहे. ज्या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे, तिथेही मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. काही तालुक्यात तर मागील वर्षीच्या तुलनेत केवळ निम्म्याच पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाने त्या त्या भागातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली. तथापि, उर्वरित धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या ९१ टक्के जलसाठा आहे. या हंगामात एखादा अपवाद वगळता गोदावरी नदी दुथडी भरून वाहिलेली नाही.

कश्यपी धरणात ६६ टक्के, गौतमी गोदावरी ७३, आळंदी १००, पालखेड ८४, करंजवण ४१, वाघाड  ७२, ओझरखेड ३२, पुणेगाव ५३, तिसगाव १३, दारणा ९१ भावली १००, मुकणे ५८, वालदेवी १००, कडवा ९३, नांदूरमध्यमेश्वर ९६, भोजापूर २३, चणकापूर ८५, हरणबारी १००, केळझर ८८, नागासाक्या ४७, गिरणा ४६, पुनद ९१ आणि माणिकपुंज धरणात १०० टक्के जलसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ४३ हजार ९९ दशलक्ष घनफूट म्हणजे ६६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ५२ हजार ५४ दशलक्ष घनफूट म्हणजे ७९ टक्के होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nashik district has 66 percent stock in 24 dams zws