नाशिक – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून बारावी परीक्षेस प्रारंभ होत आहे. परीक्षेसाठी नाशिक विभागात २८५ केंद्र आहेत. विभागातून एक लाख ७३, ६८८ परीक्षार्थी आहेत. यामध्ये एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने विविध माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीसाठी नाशिक जिल्ह्यात विज्ञान शाखेचे १५०५४, कला शाखेचे आठ हजार ९९, वाणिज्य शाखेचे एक हजार २७३, व्यावसायिक ५०३ याप्रमाणे २४, ९२९ परीक्षार्थी आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण मंडळाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. या परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयते, यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे , अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात एकूण २७ परीरक्षक केंद्र (कस्टडी) असून १२९ परीक्षा केंद्र आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत, अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचारी अदलाबदल करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात परीक्षा सुरळीत, शांततेत आणि कॉपीविरहित पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण विभागासह महसूल आणि जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर सर्व विभागांकडून परीक्षा संनियंत्रणासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील संवेदनशील, अतिसंवेदनशील तसेच उपद्रवी परीक्षा केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अशा केंद्रांबाहेर व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकही नियुक्त केले आहेत. तालुकास्तरावर भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून विभागीय मंडळामार्फत नऊ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. तसेच दक्षता समितीचे भरारी पथकही कोणतीही पूर्वसूचना न देता आकस्मिकपणे परीक्षा केंद्रांना भेट देणार आहेत.
ज्या परीक्षा केंद्रांवर यावर्षी सीसीटीव्ही नसेल, असे परीक्षा केंद्र पुढील वर्षापासून बंद करण्यात येणार आहेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीस पोलीस प्रशासनाच्या हवाली करून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासने, निर्भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, कॉपीमुक्त परीक्षा अभियानात पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
नाशिक विभागात बारावी परीक्षेसाठी २८५ केंद्र आहेत. यंदा बारावी परीक्षा काॅपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्रांच्या परिसरातील झेराॅक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
